नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा होणार आहे. यानंतर १० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहे.
केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करतना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली, मग कसं सहन करायचं?, मोदी सरकारला काहीच वाटत नाही?, त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
भाजपाने ९ वर्षांत ९ सरकारं पाडली. भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी झालं. मोदी सरकारच्या काळात दुध महागलं. जगातील अनेक यादीत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं सर्वांत मोठं अपयश असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. वंदे भारत ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मात्र हे सत्य नाकारता येणार नाही. माझ्या मतदारसंघात एकही स्थानकावर वंदे भारत थांबवत नाही. वंदे भारत केवळ पाहता येते, प्रवास करणं अशक्य असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या जागी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू केली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.मणिपूरला फटका बसला तर भारतालाही फटका बसतो. आम्ही फक्त मणिपूरबद्दल बोलत नाही. संपूर्ण भारताबद्दल बोलतो. या दु:खाच्या काळात संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे, असा संदेश यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मौन व्रत घेतले. ते लोकसभेतही काही बोलणार नाहीत आणि राज्यसभेतही काही बोलणार नाहीत. त्यामुळेच आम्हाला पंतप्रधान मोदींचं मौन व्रत अविश्वास ठरावाद्वारे तोडायचे आहे, असं गौरव गोगाई यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत? असा सवालही गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलायला ८० दिवस का लागले? पंतप्रधान मोदींकडून शोक किंवा शांततेचे आवाहन का झाले नाही? मंत्र्याला बोलण्यापासून कोणी रोखत नाही, पण पंतप्रधान मोदींच्या बोलण्याचं वजन कोणत्याही मंत्र्यामध्ये नाही. आमचा तिसरा प्रश्न आहे की, पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही. गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री बदलले, उत्तराखंड, त्रिपुरामध्येही मुख्यमंत्री बदलले. पण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आशीर्वाद का?, असे विविध सवाल गौरव गोगाई यांनी उपस्थित केले.