सरकारची बुलडोझर मानसिकता; काँग्रेसची बोचरी टीका, हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 03:57 PM2024-06-21T15:57:49+5:302024-06-21T15:58:14+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
Parliament Protem Speaker : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा 24 जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. 18 व्या लोकसभेचे अध्यक्षपद कुणाकडे असणार, यावरुन सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती केली आहे. पण, आता या नियुक्तीवरुन नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, हे संसदीय परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. प्रथेनुसार कोडीकुन्नील सुरेश यांची या पदावर नियुक्ती व्हायला हवी. पण, त्यांची नियुक्ती न करणे, ही सरकारची बुलडोझरची मानसिकता आहे. सरकार पहिल्या दिवसापासून मनमानी कारभार करत आहे.
#WATCH दिल्ली: भाजपा सांसद भर्तृहरि महताब को 18वीं लोकसभा का प्रोटेम स्पीकर नियुक्त किए जाने पर कांग्रेस नेता जयराम रमेश ने कहा, "यह संसदीय परंपरा के खिलाफ है...परंपरा के अनुसार, सबसे वरिष्ठ सांसद को प्रोटेम स्पीकर नियुक्त किया जाता है...18वीं लोकसभा में कांग्रेस के कोडिकुन्निल… pic.twitter.com/KqMg1aPHBw
— ANI_HindiNews (@AHindinews) June 21, 2024
रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश आणि वीरेंद्र कुमार (भाजप) हे दोघेही 18 व्या लोकसभेत त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2019 मध्ये वीरेंद्र कुमार आणि 2014 मध्ये कमलनाथ हंगामी अध्यक्ष बनले होते. वीरेंद्र कुमार आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे केोडीकुन्नील सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती, पण सरकारने तसे केले नाही.
भाजप बुलडोझर राजकारणाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना स्पर्धा करायची आहे. आम्हीच सरकार आहोत, हे दाखवायचे आहे. मात्र, जनादेश पंतप्रधानांच्या विरोधात आहे. ते (पीएम मोदी) आता 'श्री 400' नसून 'श्री 240' आहेत, अशी बोचरी टीकाही रमेश यांनी यावेळी केली.