संसदेत घुसखोरी करण्याचा कट रचणारा मास्टरमाइंड ललित मोहन झा याच्याबाबत आता नवनवीन माहिती समोर येत आहे. ललितचा मोठा भाऊ शंभू झा याने सांगितलं की, या घटनेत ललितचा सहभाग असल्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. तो हे करू शकतो यावर आमचा विश्वास बसत नाही. ललित गुरुवारी संध्याकाळी महेश नावाच्या व्यक्तीसोबत नवी दिल्लीतील पोलीस ठाण्यात पोहोचला होता, जिथे पोलिसांनी त्याला अटक करून स्पेशल सेलच्या ताब्यात दिलं.
ललितचा भाऊ शंभू झा याने दिलेल्या माहितीनुसार, ललित या सगळ्या गोष्टीत नेमका कसा अडकला हे आम्हाला अद्याप माहीत नाही. या सर्व गोष्टींपासून ते नेहमीच दूर राहिले. लहानपणापासूनच तो शांत होता. शिक्षक असण्यासोबतच तो अनेक स्वयंसेवी संस्थांशी संबंधित असल्याचं आम्हाला माहीत होतं. या घटनेनंतर टीव्ही चॅनलवर त्याचे फोटो पाहून आम्ही हैराण झालो आहेत.
बुधवारी रात्रीपासून शंभूला सतत फोन येत होते. पोलिसांसोबतच नातेवाईकही ललितची चौकशी करत आहेत. शंभूने सांगितले की, 10 डिसेंबरला ललितला शेवटचं पाहिलं. त्यावेळी मी माझ्या मूळ गावी बिहारला निघालो होतो. मग ललित आम्हाला सियालदह स्टेशनवर सोडायला आला. दुसऱ्या दिवशी ललितने आम्हाला फोन करून काही कामासाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले. तेव्हापासून आम्ही त्याच्याशी बोललो नाही.
"हे कसं झालं ते मला माहीत नाही"
बिहारमधील दरभंगा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ललित झाचे वडील देवानंद म्हणाले की, आपला मुलगा अशा काही घटनेत सहभागी होईल याची कल्पनाही केली नव्हती. हे नेमकं कसं घडलं हे मला माहीत नाही. ललितचं नाव यापूर्वी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात आलं नव्हतं. तो लहानपणापासूनच चांगला मुलगा आहे.
ललितच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही गेल्या 50 वर्षांपासून कोलकाता येथे राहतो, मात्र छठपूजेच्या निमित्ताने आम्ही दरभंगामधील आमच्या मूळ गावी रामपूर उदय येथे जातो. या वर्षी आम्ही आमच्या गावी वेळेवर पोहोचू शकलो नाही. त्यानंतर दहा डिसेंबर रोजी आम्ही कोलकाता ते दरभंगा या ट्रेनमध्ये चढलो, पण ललित आमच्यासोबत आला नाही.
ललितच्या शेजाऱ्यांनी जेव्हा त्याचे फोटो टीव्हीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. शेजाऱ्यांनी सांगितले की, ललित नेहमीच शांत स्वभावाचा होता. कोलकात्याच्या बाराबाजारमधील लोकांशी त्याचं फारसं बोलणं झालं नाही. बुरबाजार भागातील रवींद्र सारणीमध्ये चहाची टपरी असणारे पापुन शॉ म्हणाले की, ललित हा शिक्षक होता, परिसरातील ट्यूटर बॉय होता. दोन वर्षांपासून तो येथे दिसत नाही. काही वर्षांपूर्वी येथे एकटाच राहत होता. कधी कधी तो माझ्या दुकानात चहा प्यायला यायचा. दोन वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला आणि त्यानंतर तो परत आलाच नाही.