संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागर शर्माच्या लखनौच्या घरातून पोलिसांना एक सीक्रेट डायरी सापडली आहे. या डायरीतून अनेक गुपितं उघड होण्याची शक्यता आहे. घर सोडण्याची वेळ आली आहे, असं सागरने आपल्या डायरीत लिहिलं आहे. सागरने आपल्या डायरीत लिहिलं की, "घर सोडण्याची वेळ जवळ आली आहे. एका बाजूला भीती तर दुसरीकडे मनामध्ये काहीही करण्याची आग धगधगत आहे."
"मी माझ्या पालकांना माझी परिस्थिती समजावून सांगू शकलो असतो तर बरं झालं असतं. संघर्षाचा मार्ग निवडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. प्रत्येक क्षणी आशा आहे. मी 5 वर्षे वाट पाहत होतो की एक दिवस येईल जेव्हा मी माझ्या कर्तव्याकडे जाईन. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो नाही ज्याला कसं हिसकावून घ्यायचं हे माहीत आहे, तर सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याच्याकडे सुखाचा त्याग करण्याची क्षमता आहे."
दोन तरुणांनी संसदेत घुसखोरी केली होती. दोन्ही तरुणांनी व्हिजिटर गॅलरीतून उडी मारली. हे दोघे जण एका बाकावरून दुसऱ्या बाकावर धावू लागले. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या बुटातून पिवळा स्प्रे काढला आणि फवारणी केली. यावेळी संसदेत गदारोळ झाला. खासदारांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. मात्र, काही खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. सागर (शर्मा) आणि मनोरंजन डी (म्हैसूर) अशी त्यांची नावे आहेत.
लोकसभेच्या आत दोन लोकांनी उडी मारली, तेव्हा संसदेबाहेर निदर्शने करत असताना पोलिसांनी एक पुरुष आणि एका महिलेला अटक केली. दोघेही स्प्रे फवारत होते आणि घोषणा देत होते. अमोल आणि नीलम अशी दोघांची नावं आहेत. याशिवाय आणखी एक आरोपीही संसदेबाहेर उपस्थित होता, त्याचं नाव ललित आहे. ललितने संसदेबाहेर झालेल्या निदर्शनाचा व्हिडीओ बनवला. त्याच्याकडे सर्व आरोपींचे मोबाईल होते.
4 फोनसह सर्व पुरावे नष्ट करून मास्टरमाइंड ललितने केलं सरेंडर
संसदेतील घुसखोरीचा संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड ललित झा याने दिल्ली पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. संसदेच्या आत जाऊन निदर्शने करणाऱ्या चारही लोकांचे मोबाईल घेऊन ललित झा पळून गेला होता. तपासात देखील हेच समोर आलं आहे, मात्र आता त्याच्या सरेंडरनंतर पोलिसांना ललित आणि महेशकडे एकही मोबाईल सापडला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानहून दिल्लीत येऊन सरेंडर करण्यापूर्वी ललितने तेथेच चारही मोबाईल नष्ट केले. दिल्लीतून पळून गेल्यानंतर ललित कुचामन येथे गेला होता, जिथे तो त्याचा मित्र महेशला भेटला.