Parliament security breach ( Marathi News ) : नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने संसदेत घुसखोरी केल्याच्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आणि अमोल शिंदे या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत १५ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता आरोपींना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.
सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आणि अमोल शिंदे यांनी आधी देण्यात आलेली सात दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार होती. मात्र, आज दिल्ली पोलिसांनी या चारही आरोपींच्या १५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली. तसेच, आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. यानंतर पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपींना ५ जानेवारीपर्यंत दिल्ली पोलिसांच्या कोठडीत पाठवले आहे.
गेल्या सात दिवसांत आम्हाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून तपासाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी खुल्या कोर्टात सांगता येणार नाहीत. ही बाब अत्यंत संवेदनशील आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. तसेच, सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी चार आरोपींचे नवीन सिमकार्ड जारी करण्याची परवानगी मागितली आहे. घटनेनंतर आरोपींनी आपले सिमकार्ड नष्ट केले आहे. आम्हाला क्लोन स्वरूपात जारी केलेले नवीन सिम कार्ड मिळवायचे आहे, जेणेकरून आम्हाला त्यांचा हेतू कळू शकेल. तसेच, दिल्ली पोलिसांनी चारही आरोपींच्या सायको अॅनालिसिसची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?१३ डिसेंबर रोजी संसदेच्या शून्य प्रहरात सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि सभापतींकडे जाऊ लागले. खासदारांनी त्यांना थांबवल्यानंतर त्यांनी स्मोक कँडल फोडल्या, त्यामुळे संपूर्ण सभागृहात धुराचे लोट पसरले. त्याचवेळी, नीलम आणि अमोल शिंदे नावाच्या दोन आरोपींनी संसद भवनाबाहेर धुराचे लोट पसरवले. या घटनेतील चौघांनीही सुरक्षा दलांनी अटक केली आहे.