Parliament Security Breach News: आज(दि.13) संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक घडली. एक महिला आणि तीन तरुण लोकसभेत घुसले आणि स्मोक कँडल फोडून गोंधळ घातला. दिल्ली पोलिसांनी त्या चौघांनाही अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजप खासदार प्रताप सिम्हा अडचणीत आले आहेत. त्यांनी दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीनेच आरोपी संसद भवनात शिरले होते.
आरोपी मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि शिवानी सिंह प्रताप सिम्हा यांच्या पासवर संसदेत दाखल झाले आणि व्हिजिटर गॅलरीत बसले. यामुळे विरोधक सिम्हा यांच्यावर टीका करत आहेत. या घटनेनंतर बुधवारी संध्याकाळी सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.
संबंधित बातमी- 'संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, अमित शाह उत्तर द्या...', मल्लिकार्जुन खर्गेंनी सरकारला घेरले
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रताप सिम्हा आरोपीच्या वडिलांना ओळखतात. याच ओळखीमुळे आरोपी सिम्हा यांच्या संपर्कात होते. खासदार सिम्हा सांगतात की, आरोपींनी वारंवार संसद भवन संकुल पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ते त्यांच्या पीएच्या सतत संपर्कात होते. त्यांच्याकडे या प्रकरणाची अधिक माहिती नाही.
संबंधित बातमी- 'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया
कोण आहेत प्रताप सिम्हा? प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. सलग दोन वेळा ते या जागेवरून विजयी झाले आहेत. कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी प्रताप सिम्हा पत्रकार होते. 1999 मध्ये प्रताप सिम्हा यांनी कन्नड वृत्तपत्र विजया कर्नाटकमधून प्रशिक्षणार्थी म्हणून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी लेखन सुरू केले आहे.
संबंधित बातमी- संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...
पीएम मोदींवर पुस्तक लिहिले प्रताप सिंह यांचा जन्म कर्नाटकातील हिल स्टेशनपैकी एक असलेल्या सकलेशपूर येथे झाला. 2008 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हदी' (नरेंद्र मोदी: द अनट्रोडन रोड) नावाचे पुस्तक लिहिले. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा म्हैसूरमधून 2019 ची निवडणूक लढवली आणि जिंकली.