Parliament Security Breach News: काल(13 डिसेंबर) रोजी संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाली. धक्कादायक बाब म्हणजे, कालच्याच दिवशी देशाच्या नवीन संसदेत घुसखोरीची घटना घडली. लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारली आणि स्मोक कँडल फोडली. या घटनेनंतर चार पुरुषांसह एका महिलेला अटक झाली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. आता या आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.
अशी घडली घटनामनोरंजन गौडा, सागर शर्मा, नीलम आझाद, ललित झा आणि अमोल शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सागर शर्मा आणि मनोरंजन गौडा भाजप खासदाराच्या व्हिजिटर पासद्वारे सभागृहात पोहोचले होते. लोकसभेचे कामकाज सुरू असताना सागर आणि मनोरंजन यांनी व्हिजिटर गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि रंगीत धुराच्या नळकांड्या फोडल्या. तर, इतर दोन आरोपींनी संसद भवन संकुलात अशाच प्रकारच्या रंगीत नळकांड्या फोडल्या. पाचवा आरोपी ललित, व्हिडिओ बनवत होता, तो सध्या फरार आहे.
आरोपी एकमेकांना ओळखतात35 वर्षीय मनोरंजन कर्नाटकच्या बंगळुरुचा रहिवासी आहे, तर सागर शर्मा हा लखनौचा, 42 वर्षीय नीलम हरियाणातील जिंदची आणि 25 वर्षीय अमोल शिंदे महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. सर्व आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. हे चौघेही फेसबुक फ्रेंड आहेत. ललित झा, हा या घटनेचा मास्टरमाईंट असल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू आहे.
UAPA अंतर्गत गुन्हा दाखलबेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार (UAPA) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल यूएपीए अंतर्गत तपास करत आहे. UAPA 1967 मध्ये बनवण्यात आलेला कायदा आहे. बेकायदेशीर संस्थांवर कारवाईसाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. या अंतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.
काय शिक्षा होणार?यामध्ये आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे. तसेच, 30 दिवसांची पोलिस कोठडी आणि 90 दिवसांची न्यायालयीन कोठडी होऊ शकते. यामध्ये अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. बेकायदेशीर क्रियाकलाप म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्याच्या उद्देशाने एखादी व्यक्ती किंवा संस्थेने केलेली कोणतीही कृती. यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.