१३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा स्मृतिदिन असतानाच लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी उड्या मारून घोषणाबाजी करत एक विशिष्ट्य स्प्रे फवारला होता. तर संसद भवनाबाहेर एक तरुण आणि तरुणीने स्प्रे फवारत घोषणाबाजी केली होती. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. तसेच संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. आता या हल्ल्याला दीड महिना उलटल्यारवर आरोपींच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी मोठं करून दाखवण्यासाठी त्यांनी ही योजना आखली होती. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले. एवढंच नाही तर हा कट पूर्णत्वास नेण्यासाठीचे पैसे त्यांनी स्वत:च गोळा केले होते. आपला गुन्हा फारसा गंभीर नसल्याने पोलीस अटक केल्यानंतर त्वरित आपल्याला सोडून देतील, असं त्यांना वाटतं होतं. मात्र या घटनेची गंभीर दखल घेतली गेल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड मनोरंजन डी. हा आहे. त्याने सोशल मीडिया साईट फेसबूकवर भरत सिंग फॅन क्लब नावाचं पेज सुरू केलं होतं. त्याचा वापर तो समविचारी लोकांना काहीतरी मोठं करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी करत होता. त्यासाठी तो लोकांना प्रोत्साहित करत असे. प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी क्रांतिकारी कृत्य करा, असं आवाहन तो करायचा. हे आरोपी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे. त्यांनी संसदेत गोंधळ घालण्याची योजना वर्षभरापूर्वी आखली होती. मात्र त्यांच्या फॅन क्लबमधील अनेकजण त्यांच्या या आत्मघाती विचाराशी सहमत नव्हते.
त्यामुळेच १३ डिसेंबरच्या कटकारस्थानाला पूर्णत्वास नेण्याआधीच त्यांच्या ग्रुपमधील अनेक सदस्यांनी त्यांची साथ सोडली होती. मनोरंजन डी. याची म्हैसूर येथील भाजपा खासदारांपर्यंत ओळख होती. त्यामधून त्याने संसदेत घुसून भगत सिंगांसारखं कृत्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र याची आखणी करण्यासाठी वैयक्तिक बैठका घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया आणि सिग्नल अॅपसारख्या माध्यमांचा वापर केला. संसदेत घुसण्यापूर्वी ते गुरुग्राम येथील विक्की शर्माच्या घरी ते थांबले होते.
विक्की शर्मा हा फेसबुकवर बनवलेल्या फॅन क्लबच्या माध्यमातून आरोपींच्या संपर्कात होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले होते. अटकेनंतर केलेल्या चौकशीमध्ये लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणाऱ्या मनोरंजन डी. आणि सागर शर्मा यांनी सांगितले की, जुन्या संसद भवनाच्या तुलनेत नव्या संसद भवनामध्ये सुरक्षा कर्मचारी कमी होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, संसदेची रेकी करण्यात आली होती. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा स्मृतिदिनी सागर शर्मा आणि मनोरंजन डी. यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. त्यानंतर या आरोपींनी घोषणाबाजी करत पिवळा स्प्रे फवारला होता. तर शिंदे आणि आझाद या आरोपींनी संसद भवनाबाहेर हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा देत स्प्रे फवारला होता.