नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी करून ‘स्मोक स्टिक’चा वापर करत धूर पसरवणाऱ्या दोन तरुणांनी आपल्या बुटाचा डावा तळवा कापून बनवलेल्या अतिरिक्त जागेत ती लपवून आणल्याचे दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.
मनोरंजन डी. आणि सागर शर्मा नावाच्या या तरुणांनी लोकसभेत आणलेल्या पत्रकांमध्ये तिरंग्याच्या पार्श्वभूमीत मुठीचे चित्र होते आणि मणिपूरमधील हिंसाचारावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक घोषणा होती.
आरोपींवर दाखल गुन्ह्यानुसार, संसद भवनाच्या आत आणि बाहेर उघडलेल्या ‘स्मोक स्टिक’वर उघडताना गॉगल आणि हातमोजे वापरावेत, अशी इशारेवजा सूचना लिहिलेल्या होत्या.
सागर शर्माने त्याच्या राखाडी एलसीआर बुटाचा डावा सोल कापून अतिरिक्त रबर जोडले होते आणि त्यात जागा करण्यात आली होती. मनोरंजनच्या डाव्या बुटाच्या सोलमध्येही अशीच जागा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उजव्या बुटाचा तळही अर्धवट कापलेला आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संसद सुरक्षा भंग प्रकरणात आणखी दोन व्यक्तींची चौकशी केली असून, त्यापैकी एकाला राजस्थानमधून गुरुवारी रात्री उशिरा उचलण्यात आले. दरम्यान, बुधवारपासून फरारी असलेल्या मास्टरमाईंड झा याने गुरुवारी रात्री नवी दिल्ली जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. या आरोपींच्या ‘भगतसिंग युवा फॅन क्लब’चे फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहे.
ललितचा भाऊ म्हणतो, कुटुंब धक्क्यात
मुख्य सूत्रधार ललित मोहन झा याचा मोठा भाऊ शंभू झा यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, संपूर्ण कुटुंब अजूनही शॉकमध्ये आहे. तो या सगळ्यात कसा अडकला हे आम्हाला माहीत नाही. वादावादी, मारहाण यापासून तो नेहमीच दूर राहिला. लहानपणापासूनच तो शांत स्वभावाचा होता आणि कोणताही मिसळत नव्हता. तो खासगी शिक्षक असण्याव्यतिरिक्त, एका एनजीओशी संबंधित होता. त्याचे फोटो पाहून आम्हाला खरोखरच धक्का बसला.
चौघांचे मोबाइल नष्ट केल्याचा दावा
शिक्षक आणि एनजीओ सदस्य असलेल्या झा याने चौकशीत आरोपी सागर, मनोरंजन, नीलम आणि अमोल यांच्याकडून घेतलेले चार मोबाइल फोन नष्ट केल्याचा दावा केला आहे; परंतु, त्याची पडताळणी केली जात आहे.
हिंसक अराजकता चैतन्यशील लोकशाहीचे अपहरण करू शकत नाही. संवैधानिक अधिकारांची मजबुती आणि मूलभूत कर्तव्यांच्या मंत्राने भारताला अजेय लोकशाहीत रूपांतरित केले आहे. संवैधानिक सार्वभौमत्वाचे वर्चस्व यामुळे भारताला लोकशाहीची महाशक्ती बनविले आहे.
- मुख्तार अब्बास नक्वी,
माजी केंद्रीय मंत्री