Parliament Session 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज(दि.25) जालंधरचे काँग्रेस खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit singh Channi) आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू (RavneetSingh Bittu) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहयला मिळाली. दोघांमधील वाद इतका पेटला की, सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत थांबवावे लागले. चन्नी यांनी बिट्टूंवर काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप केला, तर बिट्टू यांनी चन्नी यांना सर्वात भ्रष्ट खासदार म्हटले.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान चरणजित सिंग चन्नी यांनी रवनीत सिंग बिट्टू यांच्यावर वैयक्तिक टीका केली. 'तुमचे आजोबा सरदार बेअंत सिंग शहीद झाले खरे. पण ते त्या दिवशी मरण पावले, ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस सोडून भाजपात गेला', अशी बोचरी टीका चन्नी यांनी केली.
यावर संतापलेल्या बिट्टूंनी जोरदार पटलवार केला. 'माझे आजोबांनी काँग्रेससाठी नाही, तर देशासाठी बलिदान दिले. हे चन्नी इतकं गरिबीबद्दल बोलतात, पण पंजाबमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात भ्रष्ट हेच आहेत. त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता नाही सापडली, तर मी माजे नाव बदलेन. 'मी टू'सह अनेक प्रकरणांमध्ये चन्नी यांचे नाव आहे', असा जोरदार पलटवार बिट्टू यांनी केला.
दोन्ही पक्षांचे सदस्य सभागृहात आमनेसामने बिट्टूंच्या वक्तव्यानंतर चन्नी यांनी बोलण्यास सुरुवात केली असता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. काही खासदार वेलमध्ये आले. विरोधी पक्षाचे खासदारही वेलमध्ये आले. दोन्ही पक्षांचे सदस्य सभागृहात आमनेसामने आल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बिट्टूंनी जे विधान केले, ते खेदजनक असून ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावे, असी मागणी काँग्रेसने केली. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही नेत्यांच्या विधानांची तपासणी झाली पाहिजे आणि ज्यांनी आक्षेपार्ह विधान केले असेल, ते कारवाईतून काढून टाकले जावे.