Parliament Session 2024 : संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आज(दि.2) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. "2014 चे दिवस आठवले तर देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला होता. देश पार निराशेच्या गर्तेत बुडाला होता. देशाचे काहीही होऊ शकत नाही, हेच शब्द 2014 पूर्वी कानावर पडायचे. दररोज वृत्तपत्रांमध्ये फक्त घोटाळ्यांच्या बातम्या यायच्या. घोटाळ्यांची जणून स्पर्धाच सुरू होती," अशी घणाघाती टीका पतप्रधानांनी केली.
'विकसित भारताचा संकल्प पूर्ण कररणार'पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "देशातील जनतेने आमची धोरणे पाहिली, आमचा हेतू पाहिला. त्यामुळेच आमच्या प्रामाणिकपणावर जनतेचा विश्वास वाढला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प घेऊन आम्ही गेले होतो. हाच संकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशाचा विकास होतो, करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण होतात, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत पाया तयार होतो. विकसित भारताचा थेट फायदा आपल्या देशातील नागरिकांच्या सन्मान आणि जीवनमानाच्या सुधारणेतून होतो. जगाच्या विकासाच्या प्रवासात भारताचाही वाटा समान असेल, हे आमचे स्वप्न आहे. मी देशवासियांना आश्वासन देतो की, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने सर्वतोपरी प्रयत्न करू."
'नेशन फर्स्ट, हेच आमचे ध्येय...'"या देशाने दीर्घकाळ तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले आणि प्रशासनाचे तुष्टीकरण मॉडेलही पाहिले आहे. जनतेने आमच्या 10 वर्षांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्डही पाहिला आहे. लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हा मंत्र बनवून आम्ही काम केले. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त होती. आम्ही भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण राबवलेत. आज जगात भारताचा गौरव होतोय. जगात देशाची विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. गेल्या 10 वर्षात आमचे सरकार सबका साथ, सबका विकास या मंत्राचे पालन करून सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करत आहे. नेशन फर्स्ट, हे आमचे ध्येय आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
'J&K मध्ये संविधान लागू करू शकले नाही'ते पुढे म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाला माहित आहे की, भारत आता आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. कलम 370 चा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, इथे संविधान डोक्यावर घेऊन नाचणारे लोक जम्मू-काश्मीरमध्ये ते लागू करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. आज तिथे 370 ची भिंत पडली अन् दगडफेक थांबली. तेथील लोक भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे येत आहेत. 2014 पूर्वी देशात वारंवार दहशतवादी हल्ले होत असत. देशाच्या कानाकोपऱ्याला दहशतवादाने पोकरले होते. पूर्वी कुठेही दहशतवादी हल्ले व्हायचे. आज भारत त्यांच्या घरात घुसून मारतो. देश आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो हे आज देशातील प्रत्येक नागरिकाला माहीत आहे."