विरोधी पक्षांचे खासदार लोकसभेच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते; PM मोदींनी दिला पाण्याचा ग्लास, बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:24 AM2024-07-03T01:24:21+5:302024-07-03T01:28:09+5:30
पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. पंतप्रधानांचे भाषण दोन तासांहूनही अधिक वेळ चालले. यावेळी सभागृहात विरोधी पक्षाचे नेते जोरदार घोषणाबाजी करत होते. काही नेत्यांनी तर वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी वेलमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या खासदाराला पीएम मोदींनी पाण्याचा ग्लास दिला. पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला.
नेमकं काय घडलं? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषण करत असताना, विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तेव्हा पंतप्रधानांनी हेडफोन लावला. दरम्यान त्यांनी पाणी पिले आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनाही विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
हिबी ईडन हे केरळमधील एर्नाकुलमचे काँग्रेसचे खासदार आहेत. या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत ते लोकसभेत पोहोचले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिबी ईडन यांनी एर्नाकुलम येथे सीपीआय (एम) च्या पी. राजीव यांचा 1.6 लाखहून अधिक मतांनी पराभव केला होता.
Amid heated protests, PM @narendramodi ji offers a glass of water to an opposition MP shouting slogans against him in the well, exemplifying calm amidst the chaos. pic.twitter.com/n3mlk5CwmF
— Adv Akhilesh Chaubey (Modi Ka Parivar) (@AkhileshChaubey) July 2, 2024
काँग्रेसवर हल्लाबोल -
यावेळी, काँग्रेस आता परजीवी झाली आहे, असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत. ते म्हणाले, "काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी लोकसभा निवडणूक निकालांचे व्यवस्थित विश्लेषण केले नाही, असे वाटते. 2024 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस परजीवी झाली आहे. ही आता परजीवी काँग्रेस आहे. परजीवीसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, परजीवी ज्याच्यासोबत असते, त्यालाच खाऊन टाकते.
देशाने 1 जुलैला खटाखट दिवस साजरा केला -
मोदी म्हणाले, "देशाने 1 जुलै रोजी खटाखट दिवस साजरा केला. 1 जुलै रोजी लोक आपल्या बँक खात्यात 8,500 रुपये आले की नाही? हे बघण्यासाठी गेले होते. या खोट्या नॅरेटिव्हचा परिणाम बघा, याच निवडणुकीत काँग्रेसने देशवासीयांची दिशाभूल केली. माता-भगिनींना दरमहा साडेआठ हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन, या माता-भगिनींवर जो आघात झाला आहे ना, तो श्राप बनून काँग्रेसला बरबाद करणार आहे.
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर खोटेपणाचा आरोप -
मोदी पुढे म्हणाले, "ईव्हीएमसंदर्भात खोटं बोलणे, संविधानासंदर्भात खोटं बोलणे, आरक्षणासंदर्भात खोटं बोलणे, यापूर्वी राफेलसंदर्भात खोटं बोलणे, एचएएलसंदर्भात खोटं बोलणे, बँकांसंदर्भात खोटं बोलणे, कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्नही झाला." एवढेच नाही तर, "हिम्मत एवढी वाढली की, काल सभागृहाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. अग्निवीरसंदर्भात सभागृहात खोटे बोलले गेले. काल येथे प्रचंड खोटे बोलले गेले," असेही मोदी म्हणाले.