Parliament Session: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत कामकाज पार पडले. जुनी इमारत सोडण्यापूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार उपस्थित होते. दरम्यान, यावेळी एका खास दृष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे दृष्य म्हणजे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया एकत्र एका बाकावर बसलेले दिसले.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवीन संसद भवनात विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज पार पडले. तत्पूर्वी, सोमवारी जुन्या संसद भवनात अधिवेशनाचा पहिला दिवस झाला. यादरम्यान अनेक फोटो समोर आले, पण सगळ्यांचे लक्ष एका फोटोवर होते. या फोटोत ज्योतिरादित्य सिंधिया आणि सोनिया गांधी एकत्र बसलेले दिसले.
संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया पुढे आले आणि त्यांनी पुढच्या रांगेत बसलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वागत केले. सिंधिया काही वेळ तिथे उभे राहिले आणि नंतर सोनिया गांधींच्या शेजारी बसले. यावेळी त्या दोघात काही बोलणेही झाले.
काही वेळाने सिंधिया आपल्या जागेवर जाऊन बसले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान, सिंधिया यांनी काँग्रेस पक्ष सोडला, तेव्हापासून ते सातत्याने काँग्रेसवर टीका करत असतात. पण, आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले.