नवी दिल्लीः 17व्या लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं अधिवेशन आहे. 40 दिवस चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात मंत्र्यांच्या ओळख परेडनं झाली आहे. यावेळी प्रत्येकाचीच नजर कोण कुठल्या जागेवर बसणार याकडे होती. कारण मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर सरकारमध्ये नंबर दोनवर कोण याचीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. आता हे स्पष्ट झालेलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या जागेवर विराजमान आहेत, त्यांच्यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शाह यांचा नंबर लागतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लोकसभेत भाजपाचे उपनेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनाचे नेते आहेत. त्यामुळे राजनाथ सिंह हे नंबर दोनचे नेते असल्याचं आता चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह मोदींच्या बाजूला बसले आहेत.गेल्या सरकारमध्ये ते मोदींच्या बाजूलाच बसत होते. नव्या कॅबिनेटमधून त्यांना गृहमंत्रिपदावरून हटवून त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालय दिलं आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांचं स्थान नंबर दोनवरून तीनवर गेल्याची चर्चा होती. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राजनाथ सिंह यांच्या बाजूला बसलेले दिसले. अमित शाह बसलेल्या जागेवर आधी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बसायच्या, त्यांच्या बाजूला थावरचंद गेहलोत आणि भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आसनस्थ व्हायचे.याशिवाय थावरचंद गेहलोत यांच्यानंतर नितीन गडकरी, सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर, हरसिमरत कौर पहिल्या रांगेत दिसले. त्यानंतर रामविलास पासवान बसले होते. परंतु ते यावेळी लोकसभेचे सदस्य नाहीत. परंतु मंत्री असल्यानं त्यांना सभागृहात बसण्याची संधी मिळाली. यंदा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंधिया सारख्या नावाजलेले नेते सभागृहात नाहीत.
लोकसभेतलं चित्र बदललं, मोदींच्या बाजूला राजनाथ, तर सुषमांच्या जागेवर अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 12:36 PM