नवी दिल्ली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) लोकशाहीच्या पवित्र मंदिराचे स्मशान केलेले आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. विरोधी पक्ष अजिबात निराश झाला नाही. मात्र ३ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर तुम्हाला सत्तेचा माज आणि विजयाची नशा चढली आहे. त्या नशेत तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघाला आहात. तुम्ही आग लावली तरी देशातील १४० कोटी जनता सती जाणार नाही. ती लढत राहील अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
संसदेतील खासदार निलंबन प्रकरणावरून राऊतांनी केंद्र सरकारला टार्गेट केले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांची काल बैठक झाली. त्यावर निलंबनाबाबत चर्चा झाली. त्यात मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही. भविष्यात २०२४ मध्ये तुमच्यावर निराश आणि वैफल्यग्रस्त होण्याची वेळ येईल हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींनी इस्त्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. मोदींनी त्या देशाच्या निवडणुकीची यंत्रणा जाणून घ्यावी. इस्त्रायलमधून आपल्या देशात ईव्हीएम हँकिंगचे तंत्र आले आहे हे सगळ्यांना माहिती आहे.परंतु इस्त्रायलमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर होतात. महाशक्तीबाबत बोलता पण लोकशाहीत महाशक्ती लपून सत्तेत येत नाही. तुम्ही उघडपणे सामोरे या आणि लढाई करा असं आव्हान राऊतांनी दिले.
तसेच महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी. आम्ही देशातील हुकुमशाहीविरोधात लढत राहू. आम्ही मिंदे नाही, गुडघे टेकायला.लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी ही आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचे मंदिर मोडून काढायचे आणि राम मंदिराचे उद्घाटन करायचे. लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान करायचे आणि अयोध्येत जाऊन राम मंदिराचे उद्घाटन करायचे हे ढोंग आमच्याकडे नाही.राम मंदिर आणि लोकशाही मंदिर संसद यांची प्रतिष्ठा राहायला हवी. लोकशाहीचं मंदिर उद्ध्वस्त करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर राम तुम्हाला पावणार नाही असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.
दरम्यान, आतापर्यंत इंडिया आघाडीच्या ३ बैठका झाल्या. कालच्या बैठकीत पहिल्यांदा पंतप्रधान चेहऱ्यावर चर्चा झाली.बहुतेक पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. उद्धव ठाकरे दिल्लीत होते. इथे ते प्रमुख नेत्यांना भेटले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसोबत स्वतंत्र चर्चा झाली. काँग्रेस पक्षात खरगेंच्या नावावर चर्चा होईल. त्यानंतर यापुढे चर्चा होईल. काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत.राहुल गांधींना सत्तेच्या पदावर यायचे नाही. ते संघटना वाढीवर लक्ष देत आहेत. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक सगळ्यांशी चर्चा करून खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आलाय अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.