Parliament Session: संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार होते, मात्र अधिवेशनाचा कालावधी एका दिवसासाठी वाढवण्यात आला. आता अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या शेवटच्या दिवशी काहीतरी मोठी घडामोड घडू शकते, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, भाजपने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करुन 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या सर्व सदस्यांना उद्या, म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दीस काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो. भाजपचे राज्यसभेतील मुख्य व्हीप लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.
'खासदारांनी दिवसभर सभागृहात हजर राहावे'लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपच्या सर्व राज्यसभा खासदारांना सूचित करण्यात येते की, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसभेत काही अत्यंत महत्त्वाचे विधायी कामकाज होणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी शनिवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सरकारे सादर केली 'श्वेतपत्रिका'दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची चिरफाड करणारी ‘श्वेतपत्रिका’ केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटांवर NDA सरकारने यशस्वीरीत्या मात केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यूपीए सरकारला वारशात धडधाकट आणि मोठ्या सुधारणांसाठी सज्ज झालेली अर्थव्यवस्था लाभूनही 2004 ते 2014 या दहा वर्षांत अर्थव्यवस्था अनुत्पादक बनल्यामुळे देशाचा आर्थिक पाया कमकुवत झाला, असा आरोप त्यात करण्यात आला. त्यानंतर एनडीए सरकारने विविध आव्हानांचा सामना करीत त्यावर कसा विजय मिळविला, याचाही विस्तृत तपशील या ‘श्वेतपत्रिके’त दिला आहे. आज आणि उद्या यावर चर्चा होणार आहे.