ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी खासदारांची पगार वाढ करण्याचा मुद्दा उचलला. खासदारांचा पगारही सातव्या वेतन आयोगाशी जोडावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सातव्या आयोगाचा उल्लेख करताना आमचा पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षाही कमी असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनीही नरेश अग्रवाल यांचं समर्थन केलं. भारतातील खासदारांना जितकं अपमानित केलं जातं तितकं कुठेच केलं जात नाही. कारण खासदार स्वतःच त्यांचा पगार वाढवतात असं येथील लोकं म्हणतात.
आज राज्यसभेत बोलताना समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी थेट मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. आमचे पगार केंद्र सरकारमधील सचिवांपेक्षा कमी असून आम्हाला मानधन वाढवून दिले पाहिजे अशी मागणी अग्रवाल यांनी केली.
खासदारांच्या पगारवाढीच्या मागणीवर केंद्र सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेऐवजी पगारवाढीच्या मागणीला प्राधान्य देणे योग्य आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
लोकसभेत गोंधळ-
बुधवारी लोकसभेत शेतक-यांच्या आणि दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. यामुळे थोड्या वेळासाठी लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.
त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर, देशात सर्वत्र शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण सरकार यावर मौन बाळगून आहे. शेतमालाला योग्य भाव देण्याऐवजी बंदुकीच्या गोळ्या मिळत आहे अशी खंत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली.
संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी-
कमी पैशांमध्ये चविष्ठ जेवणासाठी संसदेचं कॅन्टीन ओळखले जाते. मात्र मंगळवारी एका वरिष्ठ अधिका-याच्या जेवणाच्या ताटात कोळी आढळून आल्यानं कॅन्टीनमधील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे संसदेचं कॅन्टीन जेवणावरुन वादात आले आहे. श्रीनिवासन असे या अधिका-याचे नाव आहे. यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी श्रीनिवासन यांनी संसदेच्या अन्न व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ए.पी. जितेंद्र रेड्डी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. शिवाय, संसदीय व्यवहार राज्यमंत्री एस.एस अहलुवालिया यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. रेड्डी यांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्यास सांगितले आहे. श्रीनिवासन यांनी संसदेच्या कॅन्टीनमधून पोंगल आणि दही भाताची ऑर्डर दिली होती. हे पदार्थ खात असताना श्रीनिवासन यांना जेवणात कोळी सापडला.
विशेष म्हणजे, संसदेच्या कॅन्टीनमध्ये दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदारांसोबत जेवण केले होते. त्यामुळे ज्या कॅन्टीनमध्ये खासदारांसह पंतप्रधान जेवण करतात, त्याच कॅन्टीनच्या जेवणात कोळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संसदेच्या कॅन्टीनमधील स्वच्छता व जेवणाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.