नवी दिल्ली, दि. 9- स्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला बुधवारी ७५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने लोकसभेत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं. या सत्रादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी लोकसभेत बोलत होत्या. स्वातंत्र चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला आज ७५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त लोकसभेत विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं.
सध्या देशात द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण केलं जात आहे. यामध्ये खुला संवाद आणि चर्चेला स्थान नाही, अशा शब्दांत सोनीया गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यामुळे आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती धोक्यात आली आहे. यालाच विभाजनाचं राजकारण म्हणतात. जर आपल्याला आपलं स्वातंत्र टिकवायचं असेल तर अशा विरोधी शक्तींचा सामना करायला हवा, असंही सोनीया गांधी म्हणाल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरुंनी त्यांच्या जीवनातील अनेक वर्ष तुरुंगात घालवली. अनेक काँग्रेस नेत्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. इंग्रजांनी भारतातून निघून जावं, यासाठी सुरु झालेल्या ‘चले जाव’ चळवळीदरम्याना आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. पण तरीही काँग्रेसचे नेते मागे हटले नाहीत, असं मत स्वातंत्र्य चळवळीतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांविषयी सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत काही सदस्यांनी गदारोळही केला.
सोनिया गांधीचा सरकारवर हल्लाबोलभाषणात सोनिया गांधी म्हणाल्या, चले जाव चळवळीची 75 वर्ष साजरी करत असताना देशातील नागरीकांच्या मनात अनेक शंका आहेत. आपल्या देशात स्वातंत्र्याचं वातावरण आहे का? तिथेही भीतीचं वातावरण आहे ? असा सवाला सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. लोकशाहीच्या मुलभूत अधिकाऱ्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. द्वेषाच्या राजकारणाचे लोण सगळीकडे पसरले असल्यासारखं वाटत असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हंटलं.