Parliament special session, Women's Reservation Bill in Lok Sabha: संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यात आला. यावेळी जुन्या संसदेच्या आठवणींना उजाळा दिला. आजपासून अधिवेशनाचे विशेष कामकाज नव्या इमारतीत सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात आज प्रवेश केला जाणार आहे. या अधिवेशनात काय-काय होणार, याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, महिलाआरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार असून कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक सभागृहात मंजूर करण्यासाठी उद्या २० सप्टेंबर रोजी चर्चा होणार आहे. तर २१ सप्टेंबर रोजी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.
महिलाआरक्षणावर मनेका गांधींनी व्यक्त केला विश्वास
सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमात, भाजप खासदार आणि कार्यकाळाच्या दृष्टीने सर्वात ज्येष्ठ लोकसभा सदस्य मनेका गांधी यांनी प्रथम सभागृहाला संबोधित केले. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे त्यांनी संसदेतील भाषणात सांगितले. महिला आरक्षणावर मनेका गांधी म्हणाल्या की, मोदी सरकार महिलांना समान अधिकार देणार आहे. या विधेयकामुळे महिलांचे भवितव्य बदलणार आहे.
मनेका गांधी म्हणाल्या की, आम्ही नवीन संसद भवनात जात आहोत. ही नवी इमारत नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब ठरेल, अशी अपेक्षा आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी मी वयाच्या ३२ व्या वर्षी संसदेत आले. मी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून मी पक्षाची सदस्य आहे. या काळात मी सभागृहातील अनेक घटना पाहिल्या असून लोकशाहीची साक्षीदार झाले आहे.