Parliament Special Session: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनापूर्वी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 17 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत विशेष सत्र चालणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रल्हाद जोशी यांनी बुधवार (13 सप्टेंबर) X वर पोस्ट करुन सांगितले की, "या महिन्याच्या 18 तारखेला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यापूर्वी 17 तारखेच्या सायंकाळी 4.30 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यासाठी संबंधित नेत्यांना ई-मेलद्वारे आमंत्रण पाठवले आहे."
राजनाथ सिंह यांच्या घरी महत्त्वाची बैठकसंसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरीही महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विशेष अधिवेशनातील अजेंड्याबाबत चर्चा होऊ शकते. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, अनुराग ठाकूर, अश्वनी वैष्णव यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री सामील आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, विशेष अधिवेशनाची सुरुवात संसदेच्या जुन्या इमारतीत होणार असून 19 सप्टेंबरला सर्व नेते नवीन इमारतीत जाणार आहेत. नवीन संसद भवनात होणारे हे पहिलेच अधिवेशन असेल. 28 मे रोजी पंतप्रधान मोदींनी नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेची माहिती नसल्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसने अजेंड्याबाबत प्रश्न विचारलेकाँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, "आम्हाला या विशेष अधिवेशनाबाबत कोणतीही माहिती नाही. यापूर्वी जेव्हा जेव्हा विशेष सत्रे किंवा विशेष बैठका आयोजित केल्या गेल्या, तेव्हा अजेंडा अगोदरच माहीत होता." तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावरुन सरकावर ताशेरे ओढले."