संसदेचे विशेष अधिवेशन: आधी या मुद्द्यांवर चर्चा करा..; सोनिया गांधी PM मोदींना लिहिणार पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:36 AM2023-09-06T09:36:03+5:302023-09-06T09:37:12+5:30
संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार
Parliament Special Session: संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा मुख्य अजेंडा सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. या दरम्यान, काँग्रेससंसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणार आहेत. काँग्रेस पक्ष कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करण्याची अपेक्षा ठेवते या संदर्भात हे पत्र असणार आहे. काँग्रेसच्या संसदीय रणनीती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसने हा निर्णय विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांना कळवला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची छोटेखानी बैठक झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने खरगे यांनी सभागृहातील सर्व नेत्यांच्या सह्या घेऊन विरोधी आघाडीच्या वतीने पत्र लिहावे, असे काही नेत्यांनी सांगितले. पण सोनिया गांधींनी सर्व पक्षांच्या वतीने लिहावे, अशी काँग्रेसची इच्छा होती, त्यावर अखेर इतर पक्षांनी सहमती दर्शवली.
'हे' मुद्दे सभागृहात मांडण्यावर भर
एका विरोधी पक्षनेत्याने मात्र स्पष्ट केले की, हे संयुक्त पत्र किंवा I.N.D.I.A. आघाडीचे पत्र नाही. काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या लेटरहेडवर हे पत्र लिहतील. या पत्रात सोनिया गांधी महागाई, बेरोजगारी, मणिपूरची परिस्थिती, अदानी प्रकरणातील ताजे खुलासे, चीनसोबतचा सीमेवरील संघर्ष आणि फेडरल रचनेवरील हल्ले या मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करतील असे मानले जाते. विशेष अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एक राष्ट्र, एक निवडणूक आणि भारत हे नाव या कल्पनेतून राजकीय वाद वाढत असताना, १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारला अद्याप स्पष्ट करायचा नसल्याने काँग्रेस प्रतिवाद प्रस्थापित करू पाहत आहे.