- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे टीकास्त्र आणि इतर काही पक्षांकडून वाढत्या दबावामुळे काँग्रेसकडून पुढील आठवड्यात नॅशनल हेरॉल्डच्या मुद्द्यावर संसदेचे कामकाज ठप्प पाडले जाण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसच्या बदलत्या डावपेचांमुळे सोमवारपासून काही विधेयकांवर चर्चा होण्यासोबतच ती पारितही होण्याची शक्यता आहे.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याकडून काँग्रेसच्या संसदेतील बदलत्या डावपेचांचे संकेत मिळाले आहेत. हेराल्ड प्रकरणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प पडले असल्याचे चित्र भाजपाने निर्माण केले असल्याचा आरोप करून सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडावे अशीच पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी काँग्रेसतर्फे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांचा राजीनामा आणि भाजपाचे खासदार वीरेंद्र सिंग यांची माफी या दोन मागण्या संसदेत उचलून धरण्यात येतील.जीएसटीवर चर्चा...अर्थमंत्री जेटली आणि काँग्रेस नेत्यांदरम्यान बैठक होणार असून प्रस्तावित सेवा व वस्तूकर (जीएसटी) विधेयकावर या वेळी चर्चा होणार आहे. त्याचवेळी संसदेतील कोंडी फोडण्याच्या दृष्टीनेही विचार केला जाईल. लोकसभेत काही अडथळ्यांसह कामकाज सुरू आहे.