- हरीश गुप्ता नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारपासून पुढे एकूण ३३ सत्रे होणार असून, त्यात ३३ विधेयके मंजूर करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला आहे.संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या नेतृत्वाखालील सांसदीय कामकाज समितीची बैठक शनिवारी पार पडली. विरोधकांनी किती अडथळे आणले तरी पटलावर ठेवलेली विधेयके मंजूर झालीच पाहिजेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संपुआ सरकार सत्तेत असताना राज्यसभेतील गोंधळात १३ विधेयके मंजूर करण्यात आली होती, याची आठवण सरकारने विरोधकांना आधीच करून देऊन आपले इरादे स्पष्ट केले आहेत.माजी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी आपल्या पुस्तकात मोदी यांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून राज्यसभेत गोंधळ सुरू असतानाही विधेयके मंजूर करण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा केला आहे. त्यावरून या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला लोकसभेत प्रचंड बहुमत असून राज्यसभेत कामचलाऊ बहुमत आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मांडण्यात येणार आहेत. जम्मू व काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयकाचा त्यात समावेश आहे. चार विधेयके लोकसभेत मंजूर झालेली असून राज्यसभेत त्यांना मंजुरी दिली जाईल.
संसद अधिवेशनाच्या ३३ सत्रांत संमत करणार ३३ विधेयके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 3:57 AM