संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संसदेच्या परिसरातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी संसदेत विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळाबाबतही नाराजी व्यक्त केली. जे नेते आणि पक्षाला देशातील जनतेने ८० वेळा नाकारले आहे, ते संसदेमध्ये कामकाज रोखतात. दुर्दैवाने काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मोदी म्हणाले की, संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. २०२४ वर्ष आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच देश संपूर्ण उत्साहाने २०२५ या वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. हे अधिवेशन अनेक अर्थांनी वैशिष्ट्पूर्ण ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपलं संविधान यावर्षी ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. ही लोकशाहीसाठी एक उज्ज्वल संधी आहे. घटनाकारांनी संविधानाची निर्मिती करताना एकेका विषयावर व्यापक चर्चा केली होती. तेव्हा कुठे हे संविधान आपल्याला मिळालं. संसद ही याची महत्त्वपूर्ण संस्था आहे. संसदेमध्ये निकोप चर्चा व्हायला हवी. तसेच अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे.
यावेळी नव्या खासदारांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, दुर्दैवाने काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना जनतेने नाकारले आहे. ते मुठभर लोक हुल्लडबाजी करून संसदेला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा देशाची जनता शिक्षाही देते. वेदनादायी बाब म्हणजे सर्व पक्षांकडून निवडून आलेल्या नव्या खासदारांना संसदेमध्ये बोलण्याची संधी मिळत नाही, असेही मोदी म्हणाले.