Parliament Winter Session: गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष संसदेच्या संकुलात निदर्शने करत आहेत. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता या घटनेवरुन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
नेमकं काय झालं?केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, संसद परिसरातील 'मकरद्वार', हे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी आत येण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. काँग्रेस आणि त्यांचे इतर खासदार त्या जागेवर उभे राहून फलक दाखवत होते. 1951 पासून काँग्रेस पक्षाकडून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय, याविरोधात आज एनडीएचे खासदार मकरद्वारजवळ निदर्शने करत होते. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार आले आणि त्यांनी भाजपच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली. या घटनेत प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना गंभीर दुखापत झाली आहे.'
'राहुल गांधींनी खासदारांवर केलेला शारीरिक हल्ला निषेधार्ह आहे. यावरुन राहुल गांधींचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते. आम्ही योग्य ती कारवाई करणार. परंतु खासदारांवर बळाचा वापर केल्याप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागितली पाहिजे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे म्हणून आम्ही शारीरिक बदला घेत नाही. आम्ही आमची शारीरिक ताकद इतर खासदारांविरुद्ध वापरत नाही, कारण आमचा अहिंसेवर विश्वास आहे. जखमी खासदारांवर उपचार सुरू आहेत, रिपोर्ट आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.'
'खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकले का?'भाजप खासदारांनी आपल्याला संसद भवनात जाण्यापासून रोखले आणि धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. तर, राहुल गांधींनीच धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या सर्व गोंधळावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 'संसद ही कुस्ती आणि स्मार्टनेस दाखवण्याची जागा नाही.' राहुल गांधी हे जपानी मार्शल आर्ट आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. यावर किरेन रिजिजू म्हणाले, 'तुम्ही (राहुल गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का? हा शक्ती दाखवण्याचा आखाडा नाही. ही कोणत्याही राजाची खासगी मालमत्ता नाही, लोकशाहीचे मंदिर आहे. राहुल गांधींना हे समजून घ्यावे लागेल,' अशी टीका रिजिजू यांनी केली.