नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून माेदी सरकारला घेरण्याची तयारी विराेधकांनी केली आहे. काही राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुकांमुळे अधिवेशन आणि त्यात हाेणाऱ्या चर्चा प्रभावित हाेतात. मात्र, विराेधकांसह सर्वांनीच अधिवेशनात चर्चा करायला हवी. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी माेठी संधी आहे. त्यावर मते मांडण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी सांगितले.अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान माेदी म्हणाले की, निवडणुका आणि अधिवेशनाला स्वत:चे वेगळे स्थान आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन खूप महत्त्वाचे असून आपण ते जास्तीत जास्त प्रभावी करायला हवे. निवडणुका हाेत राहतील. मात्र, अधिवेशनामध्ये देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण माेहीम, मेड इन इंडिया लसीकरणाबाबत चर्चा व्हायला हवी. भारतात बनविलेल्या लसींनी जगात विश्वास निर्माण केला आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले जाईल...सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारताला आर्थिक विकासाच्या दिशेने नेता येईल, अशा मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले जाईल, याकडे सर्व सदस्यांनी अधिवेशनात भर दिला पाहिजे, असे पंतप्रधान माेदी म्हणाले.