नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन गोंधळ सुरू होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच संसदेचे कामकाज नियोजित वेळेपूर्वी अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी रात्री अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. आज सभागृहाच्या कामकाजात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.
'सभागृहाचे 18 तास 48 मिनिटे वाया गेली'
लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या गदारोळामुळे सभागृहाचे 18 तास 48 मिनिटे वाया गेल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काही वेळातच राज्यसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यासोबतच संसदेचे हिवाळी अधिवेशनही संपले.
विरोधकांकडून अयोध्येचा मुद्दा उपस्थित
सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आवश्यक कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका वृत्तपत्राच्या वृत्ताचा संदर्भ देत अयोध्येशी संबंधित मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र नायडूंनी त्याला परवानगी दिली नाही. सभापतींनी खरगे यांना मुद्दा मांडण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, असे सांगितले. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.
अधिवेशन 23 डिसेंबरला संपणार होते
संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार होते. मात्र, सभागृहातील गोंधळामुळे कामकाज एक दिवस अगोदर म्हणजेच 22 डिसेंबरलाच अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि अधिवेशनाची सांगता झाली. यावर आता विरोधकांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे आहे.