Parliament Winter Session: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काश्मीरसाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांना जबाबदार धरले. या वक्तव्यानंतर अमित शाह काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहेत. याबाबत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पलटवार करत अमित शाह यांना इतिहास माहीत नसल्याची टीका केली.
संसदेबाहेर मीडियाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "जवाहरलाल नेहरुंनी या देशासाठी आयुष्य दिले. त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास बोगला. अमित शाह यांना इतिहास माहीत नाही. ते फक्त मुख्य मुद्दे वळवण्याचा प्रयत्न करतात. आज जातीय जनगणना, कोणत्या समाजाला किती संधी दिली जात आहे, देशातील पैसा कुणाच्या हातात जातोय, या मुद्द्यावर सरकारने बोलावं."
पंतप्रधान मोदी ओबीसी आहेत पण सरकार चालवणाऱ्या 90 सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी आहेत, त्यांचीही कार्यालये कोपऱ्यात असतात. मुद्दा हा आहे की, आज सरकारमध्ये ओबीसी समाजाला, दलित समाजाला, आदिवासी समाजाला किती स्थान दिले जात आहे. यावर सरकार बोलत नाही, कारण ते घाबरतात. आम्ही हा मुद्दा पुढे घेऊन जाणार आणि देशातील गरिबांना त्यांचा हक्क मिळवून देणार," अशी टीका राहुल यांनी यावेळी केली.
अमित शाह संसदेत काय म्हणाले होते?जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केल्यानंतर राज्यसभेत यावर चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या समस्येसाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले. "आपले सैन्य जिंकत होते, पाकिस्तान माघार घेणार होता. पण, ऐनवेळी नेहरूंनी युद्धविराम घोषित केला. नेहरू आणखी दोन दिवस थांबले असते, तर आज संपूर्ण पीओके आपल्या भारतात दाखल झाला असता. स्वतःच्या फायद्यासाठी तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले. काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी जवाहरलाल नेहरुंच्या चुका होत्या, हे आता देशातील जनतेला समजले आहे," असं अमित शाह म्हणाले होते.