अबकी बार ४०० पारच्या चक्करमध्ये भाजपाने अनेक विद्यमान खासदारांना धक्का दिला आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये अनेक खासदारांचे तिकीट कापले आहे. यात काही महिन्यांपूर्वी संसदेत झालेल्या स्मोक बॉम्ब प्रकरणातील आरोपींना पास देणाऱ्या खासदाराचेही नाव आहे. निवडून येणाऱ्या नावांवर भाजपाने डाव लावला आहे.
भाजपाने कर्नाटकातील २८ पैकी २० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये फक्त १०च उमेदवार विद्यमान खासदार आहेत. अन्य खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यामध्ये बंगळुरु उत्तरचे माजी मुख्यमंत्री डीवी सदानंद गौड़ा, म्हैसुरचे प्रताप सिंह आणि दक्षिण कन्नडचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतील यांच्यासह नऊ खासदारांच्या जागी नवे चेहरे दिले आहेत.
सदानंद गौडा यांच्या जागी भाजपाने शोभा करंदलाजे यांना मैदानात उतरविले आहे. करंदलाजे या येडीयुराप्पा यांच्या खास मानल्या जातात. २०१४ मध्ये त्या याच जागेवरून लढल्या होत्या. म्हैसुरच्या राजगादीवरून काँग्रेस सरकारच्या काळात मोठा वाद उभा ठाकला होता. वारस नसल्याने राज्य सरकार म्हैसूरच्या राजघराण्याची संपत्ती ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, राजघराण्याने यदुवीर कृष्णदत्त चामराजा वडियार यांना दत्तक घेत वारस बनविले. या राजघराण्याच्या वारसाला भाजपाने म्हैसूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
दुसरा महत्वाचा बदल म्हणजे, राज्यातील सत्ता राखू न शकलेल्या बसवराज बोम्मई यांना हावेरीमधून उभे करण्यात आले आहे. उडुपी-चिकमंगळूर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी यांना तिकीट देण्यात आले आहे. खान घोटाळा प्रकरणात नाव गाजलेले व दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांचे मानसपूत्र बी श्रीरामुलु यांना बळ्लारीमधून उतरविण्यात आले आहे. तर माजी पंतप्रधान देवेगौड़ा यांचा जावई प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सीएन मंजूनाथ याना बंगळुरु ग्रामीणमधून तिकीट देण्यात आले आहे.