'संसदेची सभागृहे जनतेच्या व्यथांचा आवाज उठवण्यासाठी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:33 AM2018-12-14T05:33:06+5:302018-12-14T06:58:11+5:30
‘लोकमत’ संसदीय पुरस्कार सोहळ्यात व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : भारताच्या प्रगतीकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. सामान्यांना सर्वांगीण प्रगतीबाबत संसदेकडून खूप अपेक्षा आहेत. गोरगरीब जनतेच्या व्यथा-वेदनांचा आवाज उठवण्यासाठीच संसदेची दोन्ही सभागृहे आहेत, आरडाओरड करण्यासाठी नव्हेत, याचे भान ठेवून संसदेच्या कामकाजात व सभागृहाच्या प्रतिष्ठेत ज्यांनी मोलाची भर घातली अशा ज्येष्ठ व उदयोन्मुख सदस्यांचा लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे गौरव होत असल्याचा मला आनंद आहे, असे उद्गार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी काढले.
ग्रामपंचायती, विधिमंडळ व संसदेतील सदस्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याची लोकमतने सुरू केलेली परंपरा अभिनंदनास पात्र आहे. समाजभान जागृत ठेवणाºया राजदूताचे काम लोकमत वृत्तपत्रसमूह करीत आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी लोकमत संसदीय पुरस्काराचे मुख्य अतिथी या नात्याने काढले. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात त्यांच्या हस्ते भाजपाचे ज्येष्ठ खा. डॉ. मुरली मनोहर जोशी, तसेच खा. शरद पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व तरुण लोकसभा सदस्य निशिकांत दुबेंचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून तर आदर्श महिला खासदार म्हणून बिहारच्या रमादेवी, तामिळनाडूच्या कणिमोळी व राज्यसभेतील छाया वर्मा यांचा लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर पुरस्कार समितीच्या ज्युरी मंडळाचे सदस्य डॉ. फारूख अब्दुल्ला, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा व लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा होते.
उपराष्ट्रपतींनी दिलखुलास शैलीत भारतीय राजकारणावर शेरेबाजी करताना साºयाच खासदारांना गांभीर्याने व शिस्तीने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा सल्ला दिला. सर्व खासदारांनी कॅरेक्टर, कॅलिबर, कपॅसिटी व कॉन्डक्ट या चार गुणांवर लक्ष केंद्रित केल्यास राजकारणात गुणात्मक बदल घडून येईल व लोकांनाही अधिक चांगल्याप्रकारे न्याय देता येईल असे नमूद केले. लोकप्रतिनिधींचे वर्तन आदर्श असल्यास देश त्यांची आदराने दखल घेतो. लोकमतचे पुरस्कार हे त्याचेच प्रतीक आहे, असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी शरद पवारांच्या ५२ वर्षांच्या संसदीय कामगिरीचा, डॉ. मुरली मनोहर जोशींच्या गुणवत्तापूर्ण संसदीय सहभागाचा व गुलाम नबी आझादांच्या आदर्श संसदीय कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. निशिकांत दुबेंच्या अभ्यासू भाषणांचा, बिहार व छत्तीसगडच्या सामान्य कुटुंबातून संसदेपर्यंत पोहोचलेल्या अनुक्रमे रमादेवी व छाया वर्मांचा तसेच खा. कणिमोळींनी विनम्रतेने संसदेत छाप उमटवल्याचा उल्लेख केला. त्यांची आदर्श खासदार म्हणून निवड केल्याबद्दल ज्युरी मंडळाचे आभार मानले.
संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करणाऱ्या खासदारांवर प्रसारमाध्यमे अन्याय करतात, गोंधळ घालणाऱ्यांनाच प्रसिद्धी मिळते. ही वृत्ती मीडियाने बदलावी. मतांतरे, मतभेद असू शकतात मात्र आर्थिक सुधारणा, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रप्रेम याबाबत पक्षभेद विसरून संसद सदस्य एकत्र येतात, त्यातूनच देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करतो ही बाब लक्षात घेऊ न प्रसारमाध्यमांनी ब्रेकिंग न्यूजचा पाठलाग करण्याऐवजी संसदीय कामकाजाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून वृत्तांकन करावे, असे नायडू म्हणाले.
पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. मुरली मनोहर जोशी, शरद पवार व गुलाम नबी आझादांनी सर्व पुरस्कारप्राप्त खासदारांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुरली मनोहर जोशी : संसदेत प्रवेश केल्यापासून आजपर्यंतच्या प्रवासाची एक मोठी कहाणी आहे. सुरुवातीच्या काळात मी अनुभवलेले संसदीय कामकाज आणि सध्याच्या कामकाजात, संवादात खूपच फरक पडला आहे. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींची भाषा चिंता करण्याजोगी आहे. पण संसदेत गोंधळच होतो, कामकाज होत नाही, हा आरोप खरा नाही. संसदेच्या ४५ समित्यांमधे गांभीर्याने कामकाज होते, विविध विषयांचा उलगडा होतो. जे काम समित्यांत होते त्याची सामान्य जनतेला कल्पना नाही.
शरद पवार : गेल्या ५२ वर्षात विधीमंडळ व संसदेच्या दोन्ही सभागृहांत काम करताना अप्रतिष्ठा होईल असे कृत्य माझ्याकडून झाले नाही व मी सभापतींच्या आसनासमोर एकदाही गेलो नाही. सभागृह चालले पाहिजे, सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, विविध विषयांवर चर्चा झाली पाहिजे असे मला वाटते. आपण चांगले काम केले तर लोक मनापासून दादही देतात. लोकमतने गेल्या दोन वर्षांपासून संसदीय पुरस्कारांची जी परंपरा निर्माण केली आहे ती कौतुकास्पद आहे. नव्या खासदारांना चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याचा योग मला आला. माझ्या मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते. महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात जी नेत्रदीपक प्रगती केली त्यात दिवंगत बाबूजींचा मोठा वाटा आहे.
गुलाम नबी आझाद : सध्याच्या वातावरणात आदर्श अथवा उत्कृष्ठ संसदपटूंची निवड करणे ही अर्थातच सोपी बाब नाही. कामकाजात परफेक्शन आणणे अवघड आहे. तथापि शिक्षक, डॉक्टर व राजकीय नेत्याने कर्तव्य बजावताना जात, धर्म बाजूला ठेवायला हवा. लक्षावधी लोकांचे प्रतिनिधित्व करणाºया खासदाराचे कामकाज सोपे नाही. डोके शांत ठेवावे लागते. थोडक्या शब्दांत वर्णन करायचे तर ये इश्क नही आसाँ... आग का दरीया है और डूब के जाना है।
प्रकाश जावडेकर : मराठी भाषेतल्या लोकमतने विशेष ठसा वर्षभरात देशाच्या राजधानीत उमटवला, तो कौतुकास्पद आहे. या वृत्तपत्रात महाराष्ट्रातल्या गावोगावच्या ताज्या बातम्यांसह दिल्लीच्या साºया बातम्या आम्हाला वाचायला मिळतात. संसदेत बोलायला वेळ मिळाला पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे वातावरण तयार करायला हवे. सर्व पुरस्कार विजेत्या खासदारांचे मन:पूर्वक अभिनंदन!
ज्युरी मंडळाच्या वतीने बोलतांना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त ७0 वर्षे झाली आहेत. शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याची क्षमता संसदेत येत नाही तोपर्यंत आपल्याला खूप काम करावे लागणार आहे. त्या दिशेने प्रवास करताना पुरस्कार विजेत्यांच्या कामकाजाची प्रेरणा अन्य खासदारांना मिळेल. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले तर उपस्थितांचे आभार एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डांनी मानले. सूत्रसंचालन प्रसिध्द अँकर रिचा अनिरुद्ध यांनी केले.
'राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान'
या सोहळ्याआधी 'राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान' या विषयावर 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' झाला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारणावरील प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. उपस्थितांनीही या सर्व नेत्यांना प्रश्न विचारले. ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, बरखा दत्त व सौरव शर्मा यांनी नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. पत्रकारांचे रोखठोक प्रश्न व नेत्यांची संयत, दिलखुलास उत्तरे सविस्तर वाचा उद्याच्या अंकात.