पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दीड महिन्यांपेक्षा जास्त दिवस अमेरिकेत उपचारांसाठी राहिले असल्यामुळे आणि त्यांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीविषयी कोणतीही माहिती सरकारकडून लोकांना दिली जात नसल्यानेच शेवटी विरोधी काँग्रेस पक्ष आक्रमक बनला आहे. त्या पक्षाने राज्यपालांकडे धाव घेत गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची तक्रार केल्यामुळेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेहून फोनद्वारे गोव्यातील काही मंत्री व आमदारांशी संवाद साधला, असे राजकीय गोटात मानले जात आहे. काही मंत्र्यांनाही तसेच वाटते.पर्रीकर हे इस्पितळात उपचार घेत असताना स्वत:हून कुठल्याच मंत्री किंवा आमदाराला कधी फोन करत नव्हते. आमदार किंवा मंत्री त्यांना भेटूही शकत नव्हते. फक्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष सचिव कृष्णमूर्ती हे ठरावीक दिवसांनंतर पर्रीकर यांना फोन करून त्यांच्याशी सरकारी प्रस्तावांविषयी बोलत असे. मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेला निघण्यापूर्वी गोव्याच्या तीन मंत्र्यांची एक समिती नेमली. या समितीला मंत्रिमंडळ सल्लागार समिती असे नाव दिले व आपल्या अनुपस्थितीत या समितीमार्फत राज्याचा कारभार पुढे नेण्याचे अधिकार समितीला दिले. तथापि या समितीवरीलही एकाही मंत्र्याचा पर्रीकरांशी संपर्क होत नव्हता. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक गोव्यातील काही मंत्री व आमदारांना पर्रीकर यांचा अमेरिकेतून फोन आला. या फोनमुळे प्रदेश भाजपलाही बरे वाटले. सोमवारीच काँग्रेसचे पाच आमदार व प्रदेश काँग्रेस समिती राज्यपालांकडे गेली होती. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात सरकारच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती असून मुख्यमंत्री विदेशातून गोव्यात कधी परततील याची कुणालाच कल्पना नसल्याचे काँग्रेसने राज्यपालांना निवेदन देत सांगितले होते. राज्यपालांनी आपण अहवाल मागून घेईन तसेच आपण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्याशी याविषयी बोलेन, अशी ग्वाही दिली होती, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांचे म्हणणे आहे.पर्रीकर यांनी या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच लगेच मंगळवारी मंत्री व काही भाजपा आमदारांना फोन केला व आपण असहाय्य झालेले नसून आपली तब्येत सुधारत आहे हेच एक प्रकारे दाखवून दिले, अशी चर्चा काही मंत्र्यांमध्ये सुरू आहे. मंत्री विजय सरदेसाई, बाबू आजगावकर, उपसभापती मायकल लोबो आदींनी आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी अमेरिकेत येतो असे पर्रीकर यांना सांगितले. पण तुम्ही सध्या येऊ नका, कारण डॉक्टर तुम्हाला भेटायला देणार नाहीत, असे पर्रीकर यांनी मंत्र्यांना सांगितले.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्रीकर गोव्यात परतू शकतात, अशी चर्चा आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलण्याचे जे काम एवढे दिवस झाले नव्हते, ते काम काँग्रेस पक्ष राज्यपालांकडे गेल्यामुळे घडून आले, अशी चर्चा काँग्रेसमध्येही सुरू आहे. काँग्रेसने आदळआपट चालविल्यानेच कदाचित पर्रीकरांनी आम्हाला फोन केला असावा, असे एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. दरम्यान, गोवा सरकार चालविण्याचे काम सध्या केंद्रातीलच काही मंत्री करत असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी आदी गोव्यात अधूनमधून येतात व सरकार चालवतात असे आपल्याला वाटते, असंही त्या मंत्र्यानं सांगितलं.
काँग्रेसने राज्यपालांकडे धाव घेतल्यामुळेच पर्रीकरांचे मंत्र्यांना फोन ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 12:28 PM