पणजी : वादग्रस्त आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याशी संबंधित सर्व तथ्य ४ मे रोजी संसदेत मांडणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे सांगितले.सदर कंपनीला अनुकूलता दर्शविण्यासाठी कशा रीतीने आवश्यक कलमे आणि तरतुदी शिथिल करण्यात आल्या याबाबत संपूर्ण तपशील (क्रोनॉलॉजी)देतानाच तथ्य संसदेत समोर आणणार असल्याचे त्यांनी येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. लाचखोरांनी लाच घेतल्याचे खटला भरण्याजोगे कोणतेही पुरावे मागे सोडले नाहीत, तथापि लाच स्वीकारली गेली हे आम्हाला सिद्ध करायचे आहे. प्रत्येक बाब सिद्ध करणे आमच्या हाती आहे. तथ्ये संसदेत पटलावर ठेवली जाणार असल्यामुळे मी पत्रकारांना विस्तृत माहिती देणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.काँग्रेसला दिले खुले आव्हान२०१४ पर्यंत सदर कंपनीवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. तत्कालीन संपुआ सरकारने सदर कंपनीला काळ्या यादीत का टाकले नाही? आॅगस्टा वेस्टलँड कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्यासंबंधी आदेश तत्कालीन संपुआ सरकारने दाखवावा. या कंपनीवर बंदी का आणली नाही, याचे उत्तर आधी त्यांना देऊ द्या, या शब्दांत पर्रीकर यांनी काँग्रेसला आव्हान दिले.(वृत्तसंस्था)