इंदूर : येथील हिरानगर परिसरात एका परदेशी पोपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. येथील एका घरावर मकाऊ प्रजातीचा पोपट येऊन बसला. त्यामुळे प्रत्येक जण तो माझाच पोपट असल्याचा दावा करत होते. वाद वाढल्यानंतर अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. तब्बल तीन तास एकत्र बसून विचार केल्यानंतर वाद वाढू नये, यासाठी या पोपटाला अखेर प्राणिसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हिरानगर येथे एक रंगीबेरंगी पोपट अचानक उडून देवेंद्र लालावत यांच्या घराच्या छतावर जाऊन बसला. सामान्य पोपटापेक्षा चारपट मोठा असलेला पोपट पाहण्यासाठी लोक छतावर चढले. देवेंद्र यांनी पोपट पकडल्यानंतर कॉलनीतील प्रत्येक जण या पोपटावर हक्क सांगू लागला. त्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. यामुळे पोलिसांना बोलवावे लागले.
पोलिसही वैतागले...मकाऊ प्रजातीच्या पोपटाची किंमत दीड लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत असते. सर्व जण या महागड्या पोपटावर आपला दावा सांगू लागल्याने पोलिसही वैतागले. अखेर तीन तास चर्चा केल्यानंतर लोकांची समजूत काढून या पोपटाला प्राणिसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पोपट पाळण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. जर कोणी त्यावर दावा केला तर त्याला त्याचा परवाना सादर करावा लागेल.