INDIA Vs NDA: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांनी एकजूट दाखवण्यासाठी INDIA आघाडी स्थापन केली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे मुंबई बैठकीचे यजमानपद आहे. तर महाविकास आघाडी नियोजन करणार आहे. मात्र, यातच आता इंडिया आघाडीच्या एकजुटीला तडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण एका राज्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून, तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधीलकाँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी राज्यात एकट्याने सर्व जागा लढवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी कमकूवत होण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये त्यांचा पक्ष राज्यातील सर्व १३ जागांवर एकट्याने लढेल, तसेच यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पटियाला जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजवा बोलत होते.
पंजाबमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढेल
पंजाबमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढेल. आप आणि काँग्रेस यांची सोबत विविध राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्याशी संबंधित मुद्द्यापुरतीच मर्यादित होती. बाजवा यांच्या या वक्तव्यामुळे इंडिया एकजुटीला तडा जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष संसदेत एकत्रपणे भाजप प्रणित एडीएला जोरदार विरोध करताना दिसत आहे. त्यातच हे वक्तव्य समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेसने मागील आठवड्यात दिल्ली सेवा विधेयकाला विरोध करत आप पक्षाला समर्थन दिले होते. भाजप विरोधात कडवा लढा देण्यासाठी इंडियाने जोरदार मोर्चबांधणी केली होती. पण, शेवटी सेवा विधेयक संसदेत मंजूर झाले. त्यानंतर काँग्रेस एकट्याने लढण्याचे बोलत आहे. त्यामुळे इंडियाची आघाडी मजबूत नसल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला एकजुटीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहे. अन्यथा, एनडीएशी लढा देणे अवघड जाणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.