नवी दिल्ली : ब्रिटिशांनंतर, स्वतंत्र संस्थानांची जुलमी राजवट उलथून टाकण्याची गरज होती. स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रात चळवळ उभारणे, कार्यकर्ते जमवणे, शस्त्र जमवणे, मोर्चे काढणे या माध्यमातून लढा दिल्याच्या आठवणींना उजाळा देताना अंत:प्रेरणेमुळेच स्वातंत्र्य संग्राम लढ्यात सहभागी होऊ शकल्याचे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी सांगितले.‘भारत छोडो’, गोवा, हैदराबाद व मराठवाडा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ९ स्वातंत्र्यसैनिकांचा शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.नागपूरचे रतनचंद जैन म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील नेते आम्हाला शस्त्रे पुरविण्याचे काम सोपवायचे. लहान असल्यामुळे पोलीस आम्हाला कारवाई न करता सोडून द्यायचे. एकदा आम्ही ११ बंदुका जमिनीत पुरून ठेवल्या होत्या. नेत्यांना ताब्यात घेऊ न छळ करण्यात आला. त्यांनी बंदुका लपवल्याची माहिती पोलिसांना दिली. ते पाठीमागे लागताच आम्ही दहा बंदुका नदीत फेकल्या. मात्र, एक हस्तीदंती बनवलेली बंदूक आवडल्यामुळे ती बॅगेत ठेवली आणि पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्याबद्दल सहा महिन्यांची कैद झाली.औरंगाबादमधील लक्ष्मण राधाजी उघडे म्हणाले की, निजामाकडून छळ व्हायचा. त्यामुळे आम्ही बंड पुकारले. निजामाच्या घरावर तिरंगा फडकावल्यानंतर सैन्याने गोळीबार केला. त्यात आमचे तिघे मारले गेले. आम्ही पळून जाण्यात यशस्वी ठरलो. शिवलिंग इरप्पा ऊर्फ वीरभद्र सिद्रामप्पा मडगे म्हणाले की, सप्टेंबर १९४८ मध्ये आम्ही लातूर जिल्ह्यात निजामाविरोधात बंड पुकारले. स्वातंत्र्यसैनिक अप्पाराव पाटील यांना शस्त्रे पुरविण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही पुरविलेल्या शस्त्रांच्या जोरावर कार्यकर्त्यांनी अनेक सैनिकांची हत्या केली. सोलापूरवरून बीदरला शस्त्र आणताना पोलिसांना सापडलो आणि एक वर्षाची शिक्षा झाली. परभणीचे माधवराव कुलकर्णी यांनीही भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील लढ्याच्या आठवणी सांगितल्या.भाकरीच्या पापुद्र्याआडून...रझाकारांचा भयंकर त्रास होता. त्यामुळे आम्ही रामलिंग स्वामी, काशीनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. व्यापारी असल्यामुळे कार्यकर्त्यांना मदत करणे सोपे होते.माझ्या दुकानात साहित्य लपवून ठेवायचो. भाकरीच्या पापुद्र्यातून चळवळीच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण करायचो. क्रांतीसिंह नाना पाटील, गोंविदभाई श्रॉफ यांचे मार्गदर्शन मिळाले, असे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील बीडचे बन्सी जाधव म्हणाले.
स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग अंत:प्रेरणेतून; स्वातंत्र्यसैनिकांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 1:34 AM