नवी दिल्ली : देशाच्या फाळणीच्या वेदना कधीच विसरता येणार नाहीत. हिंसाचार व विद्वेषामुळे लाखो बंधुभगिनींना स्थलांतर करावे लागले. अनेक लोकांनी आपला जीव गमावला. त्या लोकांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी यापुढे दरवर्षी १४ ऑगस्टला फाळणी वेदना स्मृतिदिन (विभाजन विभीषिका स्मृती दिवस) पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.रविवारी देशात ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सामाजिक दुही दूर सारून एकोपा वाढावा यासाठीच फाळणी वेदना स्मृतिदिन पाळण्यात येणार आहे. देशातील सर्व लोकांमध्ये सलोखा कायम राहावा हाही या दिनामागचा उद्देश आहे.देशाच्या स्वातंत्र्यदिनी उद्या, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील. त्यामध्ये ते कोणते मुद्दे मांडणार आहेत याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होत असतानाच भारताची फाळणी झाली व त्यातून १९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाली. १४ ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भारताची झालेली फाळणी ही कधीही भरून न येणारी जखम आहे असे म्हटले जाते.
महात्मा गांधी यांचे शांततेसाठी प्रयत्नभारताच्या फाळणीच्या वेळी नौखाली व बिहारसहित अन्य काही प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. नौखालीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी यांनी त्या भागाचा दौराही केला होता.