मयूरेश वाटवे, लोकमत न्यूज नेटवर्क, वायनाड : निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर करतो, याची उत्सुकता सर्वच पक्षांना लागली आहे. मात्र, तत्पूर्वीच वायनाड मतदारसंघात आतापासून ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांमध्येच फटाके फुटू लागले आहेत. वायनाडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यासमोर लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटने (एलडीएफ) ॲनी राजा यांची उमेदवारी जाहीर करून आव्हान उभे केले.
वायनाड हा काँग्रेसचा गड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या मतदारसंघात अनुसूचित जमाती, वंचित आणि अल्पसंख्य समुदायांचे प्राबल्य आहे. गेल्या वेळी एलडीएफ उमेदवाराविरुद्धच राहुल गांधी जिंकले असले, तरी यावेळी एलडीएफने एक परिचित आणि मातब्बर चेहरा निवडणुकीत उतरवला आहे. ॲनी राजा या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि नॅशनल फेडरेशन ॲाफ इंडियन वुमनच्या महासचिव आहेत.
राहुल यांनी भाजपशी दोन हात करावेत : डी. राजा
- एलडीएफ हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असताना, काँग्रेसने राहुल गांधी यांना या मतदारसंघातून उतरविण्यापूर्वी त्यांची लढाई कोणाशी आहे, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे ॲनी राजा यांचे पती व सीपीआय महासचिव डी. राजा यांचे म्हणणे आहे.
- राहुल गांधी हे मोठे नेते आहेत. त्यांनी मित्रपक्षांशी लढण्याऐवजी अन्य कोणत्याही मतदारसंघात थेट भाजपशी दोन हात करायला हवेत. आमची लढाई फॅसिस्ट शक्तींविरोधात आहे. आम्हाला त्याविरुद्ध लढायचे आहे.
- आपला उमेदवार उभा करणे हा काँग्रेसचा हक्क आहे; परंतु त्यांची विवेकबुद्धी जागृत होवो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एलडीएफची दावेदारी
एलडीएफने ॲनी राजासारखा राष्ट्रीय चेहरा वायनाडमधून उतरवण्यापूर्वी विचार करायला हवा होता. वायनाड हा काँग्रेसचा गड आहे. काँग्रेस इथून नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे, असे इंडियन युनियन मुस्लीम लीग नेते आणि माजी आमदार सी. मामुटी यांचे म्हणणे आहे.
२०१९ च्या तुलनेत आता परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांनी मतदारांची निराशा केली आहे. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला. मात्र, काँग्रेस नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.