ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २६ - बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पैसे घेऊन गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृह सचिव व भाजपा खासदार आर. के. सिंह यांनी केला. बिहार निवडणूकीला अवघे काही दिवसच उरलेले असतानाच सिंह यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ' पक्षातील प्रसिद्ध व काम करणा-या उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात येत आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्तेही खुश नसून त्यांच्यावरही परिणाम होत आहे. भाजपाने असे पैसे घेऊन उमेदवारी दिल्यास त्यांच्यात व लालूप्रसाद यादव यांच्यात फरक काय? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
बिहारमध्ये पुढील महिन्यापासून ( १२ ऑक्टोबर) पाच टप्प्यात विधानसभा निवडणूका पार पडणार असून तेथे भाजपा वि. महाआघाडी या दोन पक्षांमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळणार आहे. बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पक्षातील खासदारानेच घरचा आहेर दिल्याने चर्चा सुरू झाली आहे.