नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपा पक्ष सोडल्याचं आश्चर्य वाटलं नाही. यशवंत सिन्हा यांचं पक्षाविरोधी लिखाणं व वक्तव्यावरून ते पक्षाचा भाग नसल्याची कल्पना आली होती. काँग्रेसच्या विचारातून ते सर्व काही बोलत असल्यासारखं वाटत होतं, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.
'यशवंत सिन्हा यांचं पक्षाविरोधी लिखाणं व वक्तव्यावरून ते पक्षाचा भाग नसल्याची कल्पना आली होती. भाजपा पक्षाने त्यांना खूप मान व महत्त्वाची जागा दिली, पण त्यांचं वर्तन अयोग्य होतं. यशवंत सिन्हा यांची वक्तव्य एखाद्या काँग्रेस नेत्यासारखी होती किंवा विरोधी पक्षाच्या हुकूमाने काम करणाऱ्यासारखी भासत होती', अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते व राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांनी दिली आहे. यशवंत सिन्हा यांच्या पक्ष सोडण्याचा निर्णयाचं कुणालाही आश्चर्य वाटलं नाही, असंही ते म्हणाले.
80 वर्षीय यशवंत सिन्हा यांनी शनिवारी पाटण्यामध्ये भाजपा पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. पक्षाच्या राजकारणात यापुढे सक्रीय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांनी अर्थ व परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला होता. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून यशवंत सिन्हा यांनी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकारची आर्थिक धोरण व सरकार चालवायची पद्धत यासगळ्यावर यशवंत सिन्हा यांनी नेहमी निशाणा साधला.