जयपूर - गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या नाराजी नाट्याचा मध्यान्ह झाला असून दुसरा अंक लगेचच सुरु झाला आहे. राजस्थान काँग्रेसचे नेते आणि माजीमंत्री सचिन पायलट यांना पक्षाने उप मुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. यावर लगेचच पायलट यांनीही पक्षाला उत्तर दिले असून त्यांना थेट भाजपामध्ये येण्याची ऑफर मिळाली आहे. राजस्थामधील राजकीय नाट्यानंतर काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी पक्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टीममधील यंग ब्रिगेड म्हणून ज्योतिर्रादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जात. मात्र, यापूर्वीच ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी काँग्रेसला बाय करत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यानंतर, आता सचिन पायलट यांनीही पक्षात बंड केल्यानंतर त्यांना उप-मुख्यमंत्रीपदावरुन आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले आहे. काँग्रेसच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी ट्विटर वरुन आपलं मत मांडलं आहे.
'पक्षातून आणखी एक मित्र निघून गेला, सचिन आणि ज्योतिर्रादित्य हे दोघेही चांगले मित्र व पक्षातील सहकारी होते. दुर्दैवाने पक्षाने 2 चांगले निष्ठावान युवक नेते गमावले आहेत. माणसाने महत्ताकांक्षी असणे यात गैर नाही. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी मोठं कष्ट घेऊन काम केलंय,' असे ट्विट प्रिया दत्त यानी केलं आहे. ज्योतिरादित्या शिंदे यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रतिभेला स्थान नसल्याची टीका करत पायलट यांचे समर्थन केले होते. पायलट यांनी काँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढल्यावरून जितिन यांनीही ट्विट केले आहे. सचिन पक्षातील सहकारीच नाहीत तर माझे मित्रही आहेत. पक्षासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आजूनही परिस्थिती सुधरू शकते अशी आशा आहे. मात्र, स्थिती आता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, असे ते म्हणाले आहेत.