Jayant Chaudhary NDA News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरूवात केली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया या आघाडीची स्थापना केली आहे. अशातच लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचा (एसपी) सहयोगी पक्ष राष्ट्रीय लोक दल (RLD) राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) सामील झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबद्दल बोलताना आरएलडीचे प्रवक्ते अनिल दुबे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
सत्ताधारी भाजपा अफवा पसरवत असल्याचा आरोप अनिल दुबे यांनी केला. आरएलडी आमदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर आरएलडी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली. आरएलडीचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल दुबे यांनी हे भाजपाचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
भाजपावर टीकापीटीआयशी संवाद साधताना दुबे म्हणाले की, दुष्काळ आणि पुराचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आरएलडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आरएलडीची एनडीएमध्ये सामील होण्याची तयारी असल्याची चर्चा सुरू आहे. पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. भाजपाला आरएलडीच्या लोकप्रियतेची चिंता आहे, म्हणूनच ते अशा अफवा पसरवत आहेत. आरएलडी 'इंडिया' आघाडीबत आहे आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र लढवणार आहे. मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीत आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आरएलडीचे एकूण नऊ आमदार आहेत. यापूर्वी देखील आरएलडी भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती, पण अध्यक्ष जयंत चौधरी यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला. अलीकडेच आरएलडीच्या आमदारांनी विधानभवनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तसेच ऊसाच्या पेमेंटला होणारा विलंब ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहे, अशा आशयाचे ट्विट आरएलडीने केले होते.