बंगळुरू: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यात आता कर्नाटकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटलमध्ये आणखी 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर आता महाविद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या 182 झाली आहे. या कॉलेजमध्ये जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
काल म्हणजेच गुरूवारी 66 वैद्यकीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संस्थेची दोन वसतिगृहे सील करण्यात आली होती. त्यानंतर संस्थेताली विद्यार्थी, कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या सूमारे 690 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. यात आता 116 रुग्णांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना झालेल्या सगळ्यांनी लस घेतली आहे.
पार्टी ठरली सुपरस्प्रेडर
धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी कॉलेजमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता, त्यामुळेच कोरोना संसर्ग वाढला. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. त्यामुळे या सर्वांना कोविड चाचणी करून घेण्यासही सांगण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तामिळनाडू, कर्नाटकात इतकी प्रकरणे
तामिळनाडूमध्ये गुरुवारी कोविड-19 चे 739 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संक्रमित लोकांची संख्या 27,23,245 वर पोहोचली आहे, तर संसर्गामुळे आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 36,432 वर पोहोचली आहे. तिकडे, कर्नाटकात कोविड-19 चे 306 नवीन रुग्ण आढळून आले, तर तेलंगणामध्ये 147 नवीन रुग्ण आढळले. तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने ही माहिती दिली.