गुलाम नबी आझाद-पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीवर पक्ष नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 08:30 AM2022-09-01T08:30:46+5:302022-09-01T08:31:41+5:30
Ghulam Nabi Azad-Prithviraj Chavan: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी गुलाम नबी आझाद यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली. याबद्दल पक्षातील काही नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. काँग्रेसच्या जम्मू व काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनी पाटील यांनीही या भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली. आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेण्याचे औचित्य नव्हते, असे मत खासदार रजनी पाटील यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना व्यक्त केले. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते ‘नो कॉमेंट्स’ एवढेच बोलले. पक्षातील एक ज्येष्ठ नेते व महासचिव यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भेटीवर नापसंती व्यक्त केली.
आझादांना भाजपकडून रसद
- खासदार रजनी पाटील यांनी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. आझाद यांना भाजपकडून रसद मिळत असल्याचे स्पष्ट जाणवल्याचे त्यांनी सांगितले.
- गुलाम नबी आझाद हे जम्मू व काश्मीरमधील भाजपची बी टीम असल्याचे काही दिवसांतच स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.
- काँग्रेस देशभरात लवकरच भारत जोडो पदयात्रा काढणार असून यामाध्यमातून केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवर घेरणार आहे.