Pashupati Paras NDA: बिहारमधील लोकसभेच्या जागा वाटपावरुन नाराज असलेल्या पशुपती पारस यांनी यू-टर्न घेतला आहे. भाजपने फसवणूक केल्याचा आरोप करत एनडीए सोडून जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी रात्री उशीरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. यावेळी पक्षाचे नेते प्रिंस राजदेखील उपस्थित होते. या भेटीत पारस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे, कारण लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एनडीएतून बाहेर पडले होते. तसेच, ते इंडिया आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. पण, पारस यांचे समर्थक आणि पुतणे प्रिन्स राज यांनी एनडीएसोबत राहण्याचा आग्रह केला. एनडीएसोबत राहून संघटना मजबूत करावी आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला मजबूत करावे, अशी मागणी त्यांची होती.
विशेष म्हणजे, होळीच्या मुहूर्तावर प्रिंस राज यांनी भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. अखेर प्रिन्स राज यांच्या पुढाकाराने पशुपती पारस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर पारस यांनी पुन्हा एकदा NDA सोबत राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता भाजपची बिहारमध्ये ताकद वाढणार आहे. या भेटीनंतर पशुपती पारस यांच्यामुळे भाजपला फटका बसणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.