एनडीएचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या कुटुंबातील वाद काही संपता संपत नाहीय. पासवान यांचा मुलगा चिराग आणि भाऊ पशुपती कुमार पारस यांच्यात राजकीय वाद असताना आता संपत्तीवरूनही वाद सुरु झाला आहे. चिराग यांचे काका पशुपती पारस आणि चिराग यांची सावत्र आई राजकुमारी देवी यांच्यात एका घरावरून वाद आहे. पारस यांनी राजकुमारी देवी यांना घराबाहेर काढले असून ती राहत असलेल्या घराला टाळे देखील ठोकले आहे. आता हा वाद चिराग यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
आधीच राजकीय लढाई आणि आता सुरु झालेली संपत्तीची लढाई ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावरच सुरु झाल्याने दोन्ही गटांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकुमारी या रामविलास पासवान यांची पहिली पत्नी आहे. शहरबन्नी गावात राजकुमारी देवी यांचे निवासस्थान आहे. त्या घरावर पारस यांच्या कुटुंबाने आपला हक्क सांगितला आहे. त्यांनी तिच्या ताब्यातील खोल्यांना टाळे ठोकले आहे.
पारस आणि रामचंद्र पासवान यांनी राजकुमारी देवी यांना घराबाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. आपल्यासोबत चुकीचे वागले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चिराग हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. रामविलास पासवान फक्त १४ वर्षांचे असताना त्यांचे पहिले लग्न झाले होते. पासवान यांनी राजकुमारी देवी यांना घटस्फोट दिला होता. यानंतर पासवान यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी लग्न केले होते. चिराग हे रीना शर्मा यांचे पूत्र आहेत. चिराग पासवान हे राजकुमारी यांना भेटण्यासाठी अनेकदा शहरबन्नी गावी जात असतात.