अहमदाबादहून बंगळुरूला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानात बसलेल्या ५६ वर्षीय प्रवाशाला विमानात विडी ओढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विमान बंगळुरू विमानतळावर उतरल्यावर प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याचं म्हणणं ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आपण अनेकदा ट्रेननंही प्रवास करतो. त्यादरम्यान आपण विडी ओढतो. म्हणून विमान प्रवासातही विडी ओढता येईल असं आपल्याला वाटल्याचं त्यांनी सांगितलं. एखाद्या विमान प्रवाशाला विडी ओढताना अटक होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
घडलं असं की प्रवासादरम्यान त्या प्रवाशाला विडी ओढण्याची तलब आली म्हणून त्यानं विमान आकाशात असतानाच विडी ओढण्यास सुरूवात केली. जेव्हा विमानात धूर दिसले तेव्हा अन्य प्रवाशांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर क्रू मेंबर्सनं त्यांना थांबवलं. परंतु त्यांना जुमानलं नाही. म्हणून विमान बंगळुरू एअरपोर्टवर आल्यानंतर त्या प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार प्रवाशाला केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर विमानात विडी पिण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. एअरपोर्टवर उतरल्यानंतर विमान कंपनीच्या ड्युटी मॅनेजरनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या प्रवाशावर अन्य प्रवाशांचा जीव जोखमीत टाकण्याच्या आरोप करण्यात आला आहे.