नवी दिल्ली, दि. 3 - चेन्नईहून बँकॉकला जाणा-या विमानात सिगारेट पेटवणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. बँकॉकला जाणा-या एअर एशिया फ्लाइटच्या क्रू मेंबर्सनं एका प्रवाशाला सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इशारा दिला. तरीसुद्धा त्या प्रवाशांनं क्रू मेंबर्सची सूचना धुडकावत विमानात सिगारेट पेटवली. त्यानंतर विमान अधिका-यांनी त्या प्रवाशाला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी प्रवाशाला दंड ठोठावला आणि त्याला समज देऊन सोडून दिलं. या प्रकाराची माहिती पायलटनं दिल्लीच्या एटीसीला दिली. विमानानं लँडिंग केल्यानंतर प्रवाशाला सीआयएसएफनं पकडून विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केलं. पायातील चप्पल काढून एअर इंडियाच्या कर्मचा-याला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांनी नो फ्लाय यादीत टाकले होते. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध करत त्यांना विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली होती. भारतातील सर्वच विमान कंपन्यांनी विमानप्रवास करण्याची बंदी घातल्यामुळे रवींद्र गायकवाड यांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये रेल्वेचा समावेश आहे. विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यापुढे गायकवाड यांना दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचा सहारा घ्यावा लागणार होता. रेल्वेशिवाय ते स्वत:च्या चार्टेट हेलिकॉप्टर किंवा गाडीने प्रवास करू शकतात, असंही स्पष्ट केलं होतं. अशा वेळी प्रवासात कमीत कमी वेळ खर्च व्हावा, अशी अपेक्षा असते. अशा परिस्थितीत रवींद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करतील की नाही याबाबत थोडी शंकाच होती. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर रवींद्र गायकवाड रेल्वेने प्रवास करत असल्याने रेल्वे अधिका-यांनो सावधान राहा असे मेसेज फिरत आहे.
उडत्या विमानात सिगारेट पेटवल्यानं प्रवाशाला भोगावा लागला तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 5:39 PM