बरेली येथून कौशांबी मार्गावर धावत असलेल्या बसमधील प्रवाशांनी बस थांबवून ६ मिनिटे नमाज पठण केले. विशेष म्हणजे कुठलाही स्टॉप नसताना चक्क बस थांबवून रस्त्यावरच ६ मिनिटे नमाज पठण करण्यात आले. बस थांबवून रस्त्यावरच नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बरेलीचे एआरएम दीपक चौधरी यांनी चालक आणि वाहक दोघांनाही निलंबित केलं आहे. तसेच, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. २० प्रवाशांना घेऊन ही जनरथ बस कौशांबीला जात होती.
शनिवारी रात्री ७.३० वाजता बरेली येथून एसी बस २० प्रवाशांना घेऊन कौशांबीला जात होती. दरम्यान, सॅटेलाईट बस स्थानकावरुन काही मुस्लीम प्रवाशी बसमध्ये चढले. रात्री जेव्हा लखनौ-दिल्ली मार्गावर बस बरेली हद्दीतून रामपूर हद्दीत शिरल्यानंतर या प्रवाशांनी चालकाला बस थांबवण्याची विनंती केली. आम्हाला १ मिनिटाचे काम आहे. त्यावेळी, चालकाने बस थांबवताच हे मुस्लीम प्रवासी बसमधून खाली उतरले. तसेच, रस्त्यावर चादर अंथरुन ते नमाज पठण करू लागले. दरम्यान, बसमधील प्रवाशांनी नमाज पठण करतानाचा व्हिडिओ काढला. तसेच, इतर प्रवाशांनी गोंधळही घातला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एआरएम दिपक चौधरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रामपूरच्या मिलक येथील हा व्हिडिओ असल्याचे चौकशीत समोर आले. याप्रकरणी बसचा वाहक मोहित यादवला बडतर्फ करण्यात आलं आहे. तर, चालक कृष्णपाल सिंह यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहक मोहित यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बसमध्ये काही मुस्लीम प्रवासी चढले होते. बस रामपूरला आल्यावर त्यांनी १ मिनिटासाठी बस थांबवण्याची विनंती केली. त्यानुसार, मी बस थांबवली असता ते काय करू लागले हे समजेना. मी थोडासा घाबरलो, तेव्हा ते नमाज पठण करत होते. आता, नमाज पठण करत असताना मी त्यांना कसं थांबवणार? असे मोहित यादवने म्हटले. यावेळी, बस ५ ते ६ मिनिटपर्यंत थांबवण्यात आली होती, असेही यादव यांनी सांगितले.