विमान प्रवासासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं(डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचं पत्रक जारी केलं आहे. विमानात प्रवाशानं मास्क योग्य पद्धतीनं घातला नसेल किंवा कोरोना नियमांचं पालन केलं जात नसेल तर अशा प्रवाशांना विमानातून तातडीनं खाली उतरवलं जावं, अशा सक्त सूचना डीजीसीएनं विमान कंपन्यांनासाठी जारी केल्या आहेत. डीजीसीएनं सर्व विमानतळ व्यवस्थापन, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सीआयएसएफ यांना नव्या नियमांचं पत्रक पाठवलं आहे. त्यासोबत नव्या सूचना तात्काळ अंमलात आणल्या जाव्यात आणि नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
काही विमान प्रवासी कोविड-१९ संदर्भातील नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. यात काहीजण विमानतळावर प्रवेश केल्यानंतर मास्क वापरत नसल्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्याचंही निदर्शनास आलं आहे, असं डीजीसीएनं लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. विमान प्रवासावेळी विमानतळात प्रवेश केल्यापासून ते आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रवाशांना मास्क परिधान करणं अपेक्षित आहे. यात मास्क नाकाखाली आलेला नसावा आणि काही प्रवासी विमानात देखील प्रवासादरम्यान मास्क काढत असल्याचं समोर आल्याचं डीजीसीएनं म्हटलं आहे.
नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईकोविड-१९ संदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना सक्त ताकीद देऊन त्यांना विमानतळावरील सुरक्षा रक्षकांच्या हवाली करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं डीजीसीएनं म्हटलं आहे.
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ताकीद दिल्यानंतरही प्रवाशानं मास्क योग्य पद्धतीनं घातला नाही. तर प्रवाशाला तातडीनं विमानातून खाली उतरविण्यात यावं, अशाही सूचना डीजीसीएनं दिल्या आहेत.