ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भारतांतर्गत विमानानं फिरण्यासाठी आजच्या घडीला पासपोर्टची सक्ती नाही. भारतीय रहिवासी विमानाची तिकीट काढून भारतात कुठेही फिरू शकतात. मात्र लवकरच तुम्हाला या विमान प्रवासासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट दाखवण्यास सांगितल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, मंत्रालय लवकरच "नो फ्लाय" यादी जारी करणार आहे. ज्यात चार प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई निश्चित होणार आहे. या चार प्रकारचे गुन्हे केल्यास तुमच्या हवाई प्रवासावर प्रतिबंध असेल. मात्र ही व्यवस्था लागू करण्याआधी प्रवाशांची ओळख होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रवाशांना विमान तिकीट बुकिंगच्या वेळी पासपोर्ट किंवा आधार कार्ड दाखवावं लागणार आहे. या दोन्हीमधील कोणतंही एक दस्तावेज ग्राह्य धरलं जाणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय पुढच्याच आठवड्यात हा नियमांचा एक ड्राफ्ट बनवून जनतेसमोर ठेवणार आहे. जनतेलाही या ड्राफ्टवर अभिप्राय देण्यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे.
जून किंवा जुलैमध्ये हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा या ड्राफ्टवर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर हा ड्राफ्ट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आधीपासूनच पासपोर्ट द्यावा लागतो आहे. सरकारला हाच नियम भारतातही लागू करावा लागणार आहे. त्यानुसारच एअरलाइन्स कंपन्यांनीही अधिका-यांशी उद्दामपणे वागणा-या प्रवाशांची ओळख पटवणंही सुरू केलं आहे.